मुंबई अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे नेतृत्व सांभाळणारे आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) म्हणून कार्यभार सांभाळतच परिसरात अंमलीपदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या यंत्रणेचे कंबरडे मोडायला सुरुवात केली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच १.९२ लाखाचा गुटखा जप्त केल्यानंतर गुरुवारी कारवाई करत त्यांनी एका गांजा विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. रितिक वाघमारे (२०) असे अटक करण्यात आलेल्या गांजा विक्रेत्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये किंमतीचा २ किलो गांजा हस्तगत केला असून, त्याच्या संपूर्ण साखळीचा पोलीस शोध घेत आहेत.
पवई पोलीस ठाण्याच्या वपोनि पदाचा सोनावणे यांनी पदभार स्वीकारताच पवई परिसरात नशाखोरांनी हैदोस घातल्याचे समोर येताच त्यांनी परिसरात धडक कारवाई करत याची विक्री करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. केवळ विक्री करणाऱ्या नव्हे तर याचे सेवन करणाऱ्या लोकांवर सुद्धा पवई पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे.
गुप्त बातमीदाराकडून गुजरात येथून पवई परिसरात गुटखा विक्रीसाठी घेवून येणाऱ्या २ आरोपींच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर, पोलिसांनी नशेचे सामान विकणाऱ्या आणि सेवन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई सुरु केली आहे. “पिकनिक हॉटेल जवळील पाईपलाईन भागात एक तरुण मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती,” असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव यांनी सांगितले.
“माहितीच्या आधारावर पवई पोलिसांनी छापा मारत २ किलो गांजासह आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.
“किरकोळ विक्री करणाऱ्या लोकांवर केलेल्या कारवाईत त्यांच्या मुख्य पुरवठादारांची माहिती मिळून आली आहे, आमचे पथक त्यांच्यावर नजर ठेवून आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे आणि पोलीस निरीक्षक विजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद राणे, पोलीस नाईक राजेंद्र देशमुख, पोलीस शिपाई प्रदीप जानकर, पोलीस शिपाई नवनाथ जावळे, पोलीस शिपाई दीपक लाहितकार यांनी ही कारवाई केली.
No comments yet.