पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. अजित नारायण लाड (६७) असे या आरोपी पतीचे नाव आहे. त्यांच्यावर त्याची पत्नी शिला अजित लाड (६५) हिची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता १९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवईतील साकिविहार रोड, खालचा तुंगा येथील सुखशांती सोसायटीत लाड हे त्यांची पत्नी शिलासोबत राहत होते. त्यांना मूलबाळ नाही. लाड आपल्या नातेवाईकांचा गारमेंट्सचा व्यवसाय सांभाळत होते. पत्नीची तब्येत सतत खराब असल्याने आणि व्यवसायात प्रचंड नुकसान झाल्यामुळे ते त्रस्त होते. त्यातच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज ही झाले होते. या कारणावरुन ते मानसिक तणावात होते.
“१० फेब्रुवारीला याच तणावातून त्यांनी पत्नी शिला यांच्या डोक्यावर हातोडीने घाव करत आणि नंतर रस्सीने गळा आवळून खून केला. त्यानंतर आम्ही दोघे देवाघरी जात आहोत अशी चिठ्ठी लिहून स्वतःचे जीवन संपविण्यासाठी ते घरातून निघून गेले. रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार उघडकीस येताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,” असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
“शिला यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ज्यानंतर त्यांची पाहणी करून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज बकायगार यांच्या तक्रारीवरुन आम्ही खुनाचा (३०२) गुन्हा नोंदविला आहे” असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले यांनी सांगितले.
या घटनेनंतर लाड चिठ्ठी लिहून घरातून निघून गेल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. “शोध मोहीम सुरु असताना कसारा येथे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जखमी अवस्थेत मिळून आले होते. त्यांना ठाणे येथे सिविल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तिथून आम्ही त्यांना तपासकामी ताब्यात घेतले आहे, असे याबाबत बोलताना अंकित गोयल, पोलीस उपायुक्त परिमंडळ १० यांनी सांगितले.
“त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे,” असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
No comments yet.