पादचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थिनीने रंगवले पादचारी पूल

fob-iit-main-gateपादचारी पूल असून ही जीवावर उदार होत वाहतुकीतून रस्ता काढत जाणाऱ्या मुंबईकरांना पादचारी पुलाकडे आकर्षित करण्यासाठी, आयआयटी पवईत शिकणाऱ्या सलोनी मेहता या विद्यार्थिनीने सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १५ तास खर्ची घालून आयआयटी मेन गेट समोरील पादचारी पूल व परिसराची साफसफाई करून पायऱ्या व भिंती चित्रे काढून आणि रंगवून लोकांना या पादचारी पुलाचा वापर करण्यासाठी आकर्षित केले आहे.

पवईत जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता निर्माणाच्या वेळेस आयआयटी मार्केट गेट, आयआयटी मेन गेट, पंचकुटीर, हिरानंदानी, रामबाग, मुख्य गणेश विसर्जन घाट आणि आंबेडकर उद्यान या ठिकाणी पादचारी पुलांचे निर्माण केले गेले आहे. मात्र, यांचा वापर खूपच अल्प प्रमाणात पादचाऱ्यांकडून केला जातो. विशेषतः हिरानंदानी व आयआयटी मेन गेट समोरील भागातून मोठ्या प्रमाणात लोक रस्ता पार करतात. हिरानंदानी बसस्टॉप जवळ रस्त्यावर दुभाजक असल्याने लोक नाईलाजस्तव पादचारी पुलाचा वापर करतात. आयआयटी मेन गेट समोर मात्र हे चित्र पूर्ण उलटे आहे. पादचारी हे वाहनांच्या गर्दीतून रस्ते काढत असल्याचे चित्र नेहमीच पहावयास मिळते. यामुळे वाहनांना अडथळे निर्माण होऊन वाहतूक विस्कळीत होत असते. वाहनांच्या गर्दीतून वाट काढत असताना अनेक अपघात सुद्धा येथे घडत असतात. हे पाहता आयआयटी पवईमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सलोनी मेहता या विद्यार्थिनीने पुढे सरसावत लोकांना पादचारी पुलाकडे आकर्षित करण्यासाठी येथील परिसरात साफ सफाई करण्यासोबतच पादचारी पुलांवर चित्रे काढून आणि रंगवून त्यांना आकर्षक बनवले आहे.

saloni-mehta“आयआयटी मेन गेट समोर रस्ता पार करणे खूप धोकादायक आहे. विशेषतः रात्री सिग्नलवर वाहने थांबायचे नावच घेत नाहीत, अशात रस्ता पार करणे जिकरीचे असते. इथे पादचारी पूल बनला तेव्हा हायसे वाटले. मात्र, काहीच दिवसात लक्षात आले कि, लोक हा पादचारी पुलाचा वापर टाळत जीव मुठीत घेवून वाहनांच्या मधूनच हा रस्ता पार करत आहेत. त्यांच्याशी केलेल्या चर्चेत समजले कि, पादचारी पुलावर आणि खालील भागात मोठ्या प्रमाणात घाण आहे. घाणेरडा वास या भागातून येत असतो. तेव्हा मी ठरवले त्यांची ही अडचण दूर करायची. मी यासाठी मुंबई पोलीस आणि पालिका यांच्याशी संपर्क साधून आधी बऱ्याच गोष्टींची पूर्तता करून घेतली आणि पुढे बरेच लोक यात जोडले गेले. चित्रे आणि रंगांच्या माध्यमातून येथील पायऱ्या आणि भिंती रंगवून लोकांना आकर्षित करण्यासोबतच येथे आलेल्या लोकांना प्रसन्न वाटावे असे वातावरण येथे निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे” असे याबाबत बोलताना सलोनी म्हणते.

ती पुढे म्हणते, “एक वाहतूक अधिकाऱ्याशी बोलताना एक गोष्ट मला शिकवून गेली ‘आम्ही जागरूक नागरिक आहोत, आम्हाला काय काय अधिकार आहेत याबद्दल आम्ही सतत सांगत असतो. मात्र आमच्या काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आहेत याचा आम्हाला विसर पडलेला आहे. पादचाऱ्यांना एवढे समजले तरी बराच प्रश्न मिटेल.’ मला कळतेय बऱ्याच लोकांना हे जास्त त्रासदायक वाटेल मात्र, परिस्थितीत नक्की बदल घडेल.”

पादचारी सुद्धा आता या पुलांकडे आकर्षित होत असून, पुलाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे याची देखभाल पाहणाऱ्या पालिका प्रशासनाने यांच्या स्वच्छता आणि रंगरंगोटीकडे ध्यान द्यावे अशी मागणी आता स्थानिकांकडून होत आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!