पवई जयभीम नगर झोपडपट्टीवर पालिकेची कारवाई; अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकावर दगडफेक

अतिक्रमण निर्मुलन पथकावर दगडफेक

पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या जयभीम नगर परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई पालिकेतर्फे गुरुवारी करण्यात आली. मात्र सकाळी कारवाईसाठी पोहचलेल्या पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक, आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी तुफान दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस कर्मचारी, पालिका कर्मचारी आणि मजूर असे २५ लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

आम्ही शांततेने स्थलांतरापूर्वी होणाऱ्या या कारवाईला विरोध दर्शवत असताना खाजगी सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस यांनी रहिवाशांवर लाठीचार्ज केल्याने रहिवाशी जखमी झाले आहेत. नाईलाजास्तव आम्हाला बचावासाठी दगडफेक करत त्यांना रोखणे भाग पडल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासकीय सूत्रांनी मांडलेली भूमिका अशी की, प्रशासनामार्फत पवई येथे ६ जून २०२४ रोजी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात येत होती.

दगडफेक करणाऱ्या लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पवईगाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे ५०० झोपड्या असलेली ‘लेबर हटमेंट’ तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आले होते. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास दिले होते.

महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ नुसार या झोपडपट्टी धारकांना यापूर्वी देखील नोटिस देण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ४८८ तरतुदीनुसार, या झोपड्यांच्या कब्जेदारांना शनिवार, दिनांक ०१ जून २०२४ रोजी कायदेशीर नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

४८ तासांच्या आत स्वत:हून ही अतिक्रमणे निष्कासित न केल्यास महानगरपालिका प्रशासनातर्फे ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले होते. महानगरपालिका प्रशासनाने विहित प्रक्रिया पूर्ण करत, आगाऊ सूचना देत पुरेसा वेळ देखील दिला होता. त्यानुसार, गुरूवार, ६ जूनला महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्त उपलब्ध होताच अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सुरू केली. या कारवाईप्रसंगी स्थानिक रहिवाशांनी विरोध करत दगडफेक केली. या घटनेत महानगरपालिकेचे ५ अभियंते, ५ मजूर व त्यासोबत १५ पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.

अचानक दगडफेक

नागरिकांचे जयभीम नगर बचाव आंदोलन

यासंदर्भात बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहत आहोत. विकासकाच्या दंडिलशाही आणि इशाऱ्यावर होत असलेली निष्कासनाची कारवाई ही अनधिकृत होती. याला आम्ही शांततेत विरोध दर्शवला असताना आमच्यावर जबरदस्ती करत हटवण्यात येत होते. यावेळी पोलीस कर्मचारी यांनी अचानक महिलांवर लाठीचार्ज  केल्याने काही नागरिकांनी बचावासाठी अचानक दगडफेक केली.”

१०.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक सुरु झालेल्या दगडफेकीमुळे पोलीस कर्मचारी देखील गांगरून गेले. तुफान दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यासह जवळपास १५ पोलीस कर्मचारी, ५ पालिका अभियंते आणि ५ मजूर जखमी झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नागरिकांचा प्रचंड रोष पाहता यावेळी पालिकेतर्फे तात्पुरत्या स्वरुपात कारवाई रोखण्यात आली.

“पालिकेच्या नियमित कारवाईच्या प्रमाणात पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी येथे तैनात करण्यात आले होते. मात्र तेथे मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिकांनी अचानक पोलीस आणि निष्कासन पथकावर हल्लाबोल केला. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी या ठिकाणी धाव घेतली. राखीव दलाच्या आणखी काही तुकड्या, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक आणि इतर पोलीस कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात करत परिस्थिती नियंत्रण आणण्यात यश आले” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून परिस्थितीचा आढावा घेत हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

शेकडो कुटुंबे रस्त्यावर

आपल्या विस्कटलेल्या संसाराची पुन्हा जुळवाजुळव करताना नागरिक

वातावरण नियंत्रणात आल्यावर संध्याकाळी पुन्हा पालिकेतर्फे या परिसरात झोपडपट्टी निष्कासनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. “आमच्या प्रतिनिधी आणि लोकांनीच आम्हाला  फसवले आहे. २५ ते ३० वर्षापासून रहिवाशी येथे राहत आहेत. आम्हाला स्थलांतरित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आज अचानक दंडिलशाही करत आमचा संसार घराबाहेर फेकत आमची घरे तोडण्यात आली आहेत. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत. ऐन पावसाळ्यात आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता या उघड्या आभाळाखाली, भर पावसात आम्ही आमची लेकरेबाळे घेवून राहण्याची वेळ आली आहे,” असे यावेळी बोलताना येथील कुटुंबांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार आरिफ नसीम खान यांनी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. “कायद्याचे उल्लंघन करण्याचा कोणालाच अधिकार नाही. आम्ही अशा लोकांचे समर्थन देखील करणार नाही. मात्र पालिका कायद्याचे उल्लंघन करत कोणालातरी ही जागा रिकामी करून देण्यासाठी कारवाई करत असेल तर निषेधार्थ आहे,” असे यावेळी माध्यमांशी बोलताना खान म्हणाले.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!