करोडो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या पवई तलावातील पाण्यात आसपासच्या परिसरातून गटाराचे पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे तलावातील पाणी दुषित होत असून, तलावात घाणीचे साम्राज्य पसरून तलावाचे रूपांतर हळूहळू गटारात होत आहे. संपूर्ण पवई तलावाच्या परिसरातून जाताना लोकांना येथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. मुंबईकर राजेश पिल्लाई यांनी फोन आणि लेखी अशा दोन्ही प्रकारे पालिकेकडे तक्रार नोंद केली आहे, तर ‘पॉज मुंबई’ संस्थेतर्फे ‘मिशन सेव्ह पवई लेक’ अंतर्गत राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, पालिका सहाय्यक आयुक्त ‘एस’ विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून तक्रार नोंदवली असून; त्वरित तलावात सोडले जाणारे दुषित गटाराचे पाणी रोखून निसर्ग वाचवण्यात मदत करण्याची मागणी केली आहे.
जवळपास ५२० एकर परिसरात पसरलेल्या पवई तलाव भागात पर्यटन स्थळ म्हणून येणाऱ्या मुंबईकरांचे लोंढे बघता २००६ साली या तलावाचे आणि आसपासच्या परिसराचे सुशोभिकरणाचे काम करण्यात आले असून, जवळपास १०० कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ज्या अंतर्गत पालिकने पवई तलावाच्या सफाईचे काम सुद्धा केले आहे, परंतु गेल्या दशकात पवईत निर्माण झालेल्या नजीकच्या वस्त्यांमधील सांडपाणी तलावात सोडण्यासाठी यावेळी नव्याने दरवाजे उभारण्यात आले. रोजच्या सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावाच्या प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून, तलावात घाणीचे साम्राज्य पसरून त्याचे गटारात रुपांतर झालेले आहे.
प्रदूषणामुळे तलावातील जलचरांच्या जातीही नष्ट होत आहेत. काही वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात या तलावात माशांच्या निरनिराळ्या प्रकारच्या ३५ जाती पहायला मिळत, परंतु आता माशांच्या निरनिराळ्या जाती संपुष्ट येऊन सध्या फक्त ११ माशांच्या जाती उरल्या आहेत. तर दहा वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार तलाव परिसरात जवळपास ११८ जातीच्या स्थानिक, परदेशी व स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्त संचार येथे होता, परंतु वाढत्या प्रदूषणामुळे आता केवळ ७० पक्ष्यांच्या जातीच येथे आढळून येत आहेत. जलचर आणि मगरी यांचे जीवन सुद्धा धोक्यात आले असून, काही जीव प्रदूषणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना पॉज मुंबईच्या व्यवस्थापक आणि माध्यम प्रमुख निशा कुंजू म्हणाल्या, “आम्ही पालिका सहाय्यक आयुक्त व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पत्र लिहून तलावात सोडल्या जाणाऱ्या घाण पाण्याची तक्रार दिली आहे.”
“सांडपाणी तलावात सोडण्यात येणाऱ्या ठिकाणांची छायाचित्रे व चित्रीकरण सुद्धा आम्ही पालिका अधिकाऱ्यांना दिली आहेत. तलावात मोठ्या प्रमाणात घाण सोडली जात असून यामुळे नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होत आहेच, सोबत जलचर आणि पक्षी यांच्यावर सुद्धा या प्रदूषणाचा परिणाम होत आहे. त्यामुळे हे दुषित पाणी सोडणाऱ्या लोकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी सुद्धा आम्ही केली आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना पॉज संस्थेचे संस्थापक सुनिश सुब्रमण्यम यांनी सांगितले.
मुंबईकर राजेश पिल्लाई यांनी सुद्धा पालिकेला फोन तक्रार क्रमांक ०७२२०१४७२० व लेखी तक्रार क्रमांक ०७२२०१००३९ (दिनांक १३ मार्च २०१६) नुसार तक्रार नोंदवल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी या तक्रारींचा संदर्भ घेऊन पालिकेकडे पाठपुरावा करण्याचे आव्हान ही त्यांनी केले आहे.
[email protected] या इमेल आयडीवर आपले मत पाठवून आपणही ‘पवई तलाव बचाव’ मोहिमेत सहभागी होऊ शकता.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
[…] परिसरात दुर्गंधी येत आहे. याबाबत ‘पवई तलावाचे झाले गटार, निसर्गप्रेमी … या मथळ्याखाली आवर्तन पवईने बातमी […]