पवई तलावात सोडले जाणाऱ्या दुषित, घाण पाण्यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. जे पाहता प्लॅंट एंड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) मुंबईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री (वन आणि पर्यावरण) प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे पवई तलावाला ‘मगर पार्क’ घोषित करण्याची मागणी केली आहे. सोबतच तलाव भागात परवाना आणि विनापरवाना दोन्ही प्रकारे चालणारी मच्छिमारी रोखण्याची मागणी सुद्धा त्यांनी या पत्रांमधून केली आहे.
पवई तलावात गेल्या काही महिन्यांपासून गटाराचे घाण पाणी सोडले जात आहे. यामुळे पवई तलावात घाणीचे साम्राज्य पसरून संपूर्ण परिसरात दुर्गंधी येत आहे. याबाबत ‘पवई तलावाचे झाले गटार, निसर्गप्रेमी चिंतेत’ या मथळ्याखाली आवर्तन पवईने बातमी करून पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. ज्यानंतर स्थानिक प्रतिनिधींनी पालिकेकडे केल्या पाठपुराव्यात पालिका अधिकारी लवकरच भेट देवून ते घाण पाणी कुठून येत आहे याचा तपास करणार असल्याचे सांगितले जात आहे.
“आम्ही पवई तलावाला भेट दिली असता पावसाचे पाणी तलाव भागात जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात घाण पाणी तलावात जात असल्याचे आढळून आले. सोबतच संपूर्ण तलावातील पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी सुद्धा येत आहे. पवई तलावात कोणीतरी हिरवा रंग टाकावा असा पाण्याला रंग चढला आहे. तलाव हा मोठ्या प्रमाणात दुषित झाला असून त्याचा परिणाम पाण्यात आणि परिसरात असणाऱ्या जीवांवर होत आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना पॉज संस्थेचे संस्थापक सुनिश सुब्रामानियम यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “जवळपास २००६ पासून तलाव भागात सौन्दर्यकरण व तलावातील गाळ, जलपर्णी आणि घाण काढण्याचे काम चालू आहे, मात्र यामुळे यातील जलचर, मगरी, पक्षी यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. तलावातील प्रदूषण आणि कामामुळे माश्यांच्या अनेक जाती नष्ट तर झालेल्या आहेतच परंतु २-३ मगरी सुद्धा मृत्युमुखी पडलेल्या आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे सर्व रोखायचे असेल तर आम्हाला नैसर्गिक संपत्तीला जपणे जरुरी आहे आणि याच संपत्तीच्या रक्षणासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना पत्र देवून पवई तलावाला मगर पार्क म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.”
“पवई तलावात वैध आणि अवैध मार्गाने चालणारी मासेमारी रोखणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचे दर्शन घडत असल्याने या तलावाला मगर पार्क म्हणून मान्यता देण्यात यावी” असे आवर्तन पवईशी बोलताना पॉज मुंबईच्या व्यवस्थापक आणि माध्यम संपर्क प्रमुख निशा कुंजू यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.