पवई पोलिसांनी पवई येथील ५४ वर्षीय चार्टर्ड अकाऊटंटला साथीदार मिळवून देण्याच्या बहाण्याखा
ली ३.३ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाला वेस्ट बेंगाल येथून अटक केली आहे. अर्णब सिंग उर्फ नील रॉय बनमाळी (वय २६) हा कोलकाता येथील हावडा येथील रहिवाशी असून, त्याला शनिवारी अटक करण्यात आली. पवई पोलिस त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. दोनदा घटस्फोट घेतलेला सीए ऑनलाईन डेटिंगद्वारे जोडीदाराच्या शोधात असताना या फसवणुकीचा बळी ठरला.
पोलिसांना दिलेल्या जवाबात सीएने म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात त्याने लोकेन्टो डॉट कॉम नावाच्या संकेतस्थळाला भेट दिली होती. तेथे त्याने स्वत: ची नोंदणी केल्यावर वेबसाईटवर त्याला काही मोबाईल नंबर मिळून आले होते. ज्याच्यावर फोन केल्यावर त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ९ एप्रिल २०१९ला एका महिलेने फोन करून स्वत:ची जेनी म्हणून ओळख करून देत त्याच्याकडे कोणत्या प्रकारच्या स्त्री बरोबर डेटिंगमध्ये रस आहे असे विचारले. बंगाली महिलेसोबत असे तक्रारदार याने उत्तर देताच तिने त्याला आधार कार्ड नंबरची मागणी केली.
ते पुढे म्हणाले की, काही तासानंतर जेनीने पुन्हा फोन करून नोंदणी फी म्हणून ८३० रुपये भरण्यास सांगितले आणि त्याला चार महिलांची छायाचित्रे पाठवली. तक्रारदार यांनी देवजनी चक्रवर्ती नावाच्या महिलेची निवड केल्यानंतर कॉलरने महिलेचा संपर्क क्रमांक मिळविण्यासाठी १८,७०० रुपयांची मागणी केली. तक्रारदार याने १० एप्रिल रोजी रक्कम हस्तांतरित करताच त्याला चक्रवर्तीचा मोबाईल नंबर पाठविण्यात आला, ज्याच्यावर दोघे बोलू लागल्यानंतर तक्रारदाराने तिला भेटण्याची विनंती केली.
“महिलेने सुरुवातीला नकार दिला आणि करार फी म्हणून ४९,९०० रुपये देण्याची मागणी केली. त्याने रक्कम हस्तांतरित केल्यानंतर दोघांनी १२ एप्रिलला भेटण्याचे मान्य केले, मात्र तिने पुन्हा फोन करून आणखी ६४,००० रुपयांची मागणी केली. त्याने पुन्हा तिला पैसे दिले,” असे पवई पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.
दुसर्या दिवशी दोघांनी पुन्हा भेटण्याचे ठरविले पण चक्रवर्ती यांनी पुन्हा फोन करून ४०,००० रुपयांची मागणी केली. फक्त महिलेला भेटण्यासाठी तक्रारदार यांनी २.३१ लाख रुपये दिले. पण प्रत्येकवेळी शेवटच्या क्षणी ती भेट रद्द करत राहिली म्हणून त्याने जेनीशी संपर्क साधत चक्रवर्ती विरूद्ध तक्रार केली.
त्यानंतर एका व्यक्तीने तक्रारदार यांच्याशी संपर्क साधत तो चक्रवर्तीचा मालक असल्याचा दावा केला. “या व्यक्तीने तक्रार नोंदवण्यासाठी तक्रारदार यांना ७०,००० रुपयांची मागणी केली. ती रक्कम सुद्धा तक्रारदार यांनी दिली,” असे याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले.
तक्रारदार नोंदणी शुल्क किंवा इतर शुल्काच्या बहाण्याने फसवणूक करणार्यांना पैसे देत राहिले. “त्या व्यक्तीने पुन्हा तक्रारदाराकडे ८५,००० रुपयांची मागणी केल्यावर काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच त्याने करार रद्द करण्याची विनंती केली. परंतु जेव्हा त्याने पैसे परत करण्याची मागणी केली तेव्हा कॉलरने नकार देत फोन बंद केला. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याची लक्षात येताच पवई पोलिसात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा नोंद केला.
काही महिन्यांनंतर हावडा येथे पवई पोलिसांनी अर्णब सिंगला शोधण्यात यश मिळवत पोलिस पथक रवाना केले, मात्र तो मिळून आला नव्हता. नंतर त्यांना कळले की त्याला खारघर पोलिसांनी अशाच एका प्रकरणात अटक केली आहे. शनिवारी पवई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु असून, पोलीस त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत.
No comments yet.