सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी भागातील सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा २४.७१ लाखांचा डल्ला मारल्याच्या आरोपाखाली पवई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
जलवायू विहार येथे राहणारे माजी नौदल अधिकारी पत्नीसह आगरतळा येथे गेले होते. आपल्या घराची चावी त्यांनी घरकाम करणारी बाई शैला शिर्के यांच्याकडे सोपवल्या होत्या. “शिर्के फक्त घर स्वच्छ करण्यासाठी ते घर उघडत असे आणि काम झाले कि निघून जाई. १९ सप्टेंबर रोजी जेव्हा ती तिथे घर साफ करण्यासाठी पोहचली तेव्हा तिला दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घराची तोडफोड झाली आहे आणि मौल्यवान वस्तू हरवल्याचा संशय आल्याने तिने तिच्या मालकांना माहिती दिली आणि नंतर पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
भारतीय दंड संहितेच्या कलम ३८० (घर फोडणे), ४५४ (गुप्तपणे घर-अतिक्रमण किंवा घर फोडणे) आणि ४५७ (रात्रीच्या वेळी घरफोडी करणे) ३४ (एकापेक्षा अधिक व्यक्तीचा सहभाग) गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान सीसीटीव्हीमध्ये तीन जण एका कारमध्ये संकुलात आले असल्याचे आढळले. त्यांच्या संपूर्ण हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्यांचे फोटो घेवून मुंबई आणि आसपासच्या पोलीस ठाण्यात पाठवले असता, यातील एक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे समोर आले.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनवणे यांच्या नेतृत्वात निरीक्षक (गुन्हे) श्रीकृष्ण हरगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड आणि पोलीस उपनिरीक्षक यश पालवे आणि गुन्हेप्रकटीकरण पथक अशी एक टीम तयार करून तांत्रिक मदतीने आरोपींचा शोध सुरु करण्यात आला.
तपासादरम्यान गोवंडी येथे राहणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळताच पवई पोलीस ठाण्याचे एक पथक हैद्राबाद येथे रवाना करण्यात आले. “आरोपी हे सतत आपली जागा बदलत इंदोर, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, नोएडा-दिल्ली असे फिरत होते. “१० दिवस हैद्राबाद येथे तांत्रिक माहितीच्या आधारे पाळत ठेवून गौस पाशा मोईनुद्दीन शेख आणि तौसीफ मोहमद मंगल कुरेशी यांना ताब्यात घेतले,” असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.
शेख आणि कुरेशी यांनी दिलेल्या माहितीवरून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सलीम हबीब कुरेशी उर्फ मुन्ना हा बंगलोर येथे असल्याची माहिती मिळताच अजून एक पथक तिकडे रवाना करण्यात आले. “सलीम हा बंगळूर येथून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला रायचूर, कर्नाटक येथून ताब्यात घेण्यात आले,” असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक यश पालवे यांनी सांगितले.
चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. “अटक सर्व आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. यातील मुख्य आरोपी सलीम उर्फ मुन्ना याच्यावर मुंबई २५, पुणे १०२, सायबरा तेलंगणा ६५, हैदराबाद १५, सुरत-राजकोटमध्ये चार, नाशिकमध्ये तीन आणि जयपूरमध्ये एक अशा गुन्ह्यांची नोंद आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.
“अटक आरोपींकडून चोरीला गेलेल्या मालमत्ते पैकी ३०० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने सलीम याच्या गोवंडी येथील घरातून तर हैदराबाद येथील मन्नपुरम गोल्ड फायनान्स येथे गहाण ठेवलेले उर्वरित १८० ग्राम सोन्याचे दागिने असे एकूण ४८० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने असा ९० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे,” असे यासंदर्भात बोलताना पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “विशेष बाब म्हणजे, आरोपी वेगवेगळ्या राज्यांत आणि शहरांमध्ये विमानाने प्रवास करतात आणि चोरी करून हैदराबादला परत जातात.” सलीम हा मुंबईचा रहिवासी आहे पण तीन महिलांशी लग्न केल्यानंतर हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये स्थायिक झाला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये आतापर्यंत २०५ पेक्षा जास्त घरफोडी / चोऱ्या केल्या आहेत.
“सलीमने मध्यप्रदेशातील अनेक उच्च दर्जाच्या व्यक्ती, राजकारण्यांच्या घरी चोरी केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या घरीही त्याने चोरी केली आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
गुन्ह्याची पद्दत
यातील सह आरोपी हे उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या घरावर लक्ष ठेवून असतात. पवईतील गुन्ह्यात त्याने आणि त्याच्या साथीदारांनी इमारतीवर लक्ष ठेवले होते. तक्रारदार यांच्या फ्लॅटची लाईट काही काळापासून बंद आहे. हे लक्षात येताच सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून दोघांनी इमारतीत प्रवेश केला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. गुन्हा करून पळून जाताना त्यांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाले होते.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे) आबुराव सोनावणे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकृष्ण हरगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड, पोलीस उपनिरीक्षक यश पालवे, पो.ह. मोहोळ, पो.ह. अंडागळे, पो.ना. येडगे, पो.ना. जाधव, पो.शि. देशमुख, म.पो.शि. लाड, पो.शि. पिसाळ, पो.शि. चौगुले यांनी सदर कामगिरी पार पडली.
No comments yet.