वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रेते आणि सेवन करणारे यांच्यावर धडक कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी पुन्हा कारवाई करत १.६ किलो गांजासह एका विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. इर्शाद सरताज अली शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पवई परिसरात नशाखोरी वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सतत होत असतात. याच तक्रारींची दखल घेत पवई पोलिसांनी परिसरात गस्ती वाढवत नशेचे पदार्थ विक्री करणारे आणि सेवन करणारे दोघांवरही कडक कारवाई सुरु केली आहे. रविवारी हिरानंदानी येथे पार पडलेल्या नागरिक-प्रशासन संवाद बैठकीत नागरिकांनी हा मुद्दा उचलल्याने काही भागात नवीन बीट चौकी उभारून तर काही ठिकाणी धडक कारवाई करून या समस्येवर कार्य करण्यात येणार आहे. पाठीमागील महिनाभरात पवई पोलिसांनी धडक कारवाई करत गांजासह अनेक विक्रेत्यांना अटक केली आहे.
शनिवार, १३ मार्चला वपोनि सोनावणे आणि पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापसे, सहाय्यक फौजदार राणे, महिला पोलीस हवालदार पाटील, पोलीस नाईक देशमुख आणि पोलीस शिपाई जावळे यांना फिल्टरपाडा परिसरात गस्त घालण्याचे कार्य सोपवण्यात आले होते. गस्तीच्या वेळी पठाणवाडी भागात एक इसम निळ्या रंगाची पिशवी घेवून संशयास्पदरित्या वावरताना दिसून आला.
“आम्हाला संशय आल्याने आम्ही त्याला ताब्यात घेवून पिशवी तपासून पाहिली असता त्यात गांजा मिळून आला”, असे याबाबत बोलताना सपोनि कापसे यांनी सांगितले.
शेख याच्या ताब्यातून पोलिसांनी १.६ किलो गांजा हस्तगत केला आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्यातर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.