पवई परिसरात अवैध मार्गाने गुटखा विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना पवई पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप खारवाल (४८) आणि कल्पेश प्रकाश पावसकर (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एक कारसह १ लाख ९२ हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा अशी एकूण ५ लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पवई पोलिसांना सफेद रंगाची मोटारकार क्रमांक एमएच ०१ एएक्स ४२५०मधून गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. “गुजरात येथून निघालेली सफेद रंगाची कार दहिसर चेकनाका पार करून पवईच्या हद्दीत आल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने मिलिंदनगर येथे पाळत ठेवली असताना एक इसम एका सफेद कारजवळ संशयास्पदरित्या वावरताना दिसून आला.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
‘इसमाला ताब्यात घेवून कारची झडती घेतली असता आम्हाला गोणीत १ लाख ९२ हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला.” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी सांगितले.
आरोपीच्या चौकशीत त्याच्या अजून एका साथीदारासोबत मिळून तो हे करत असल्याचे समोर येताच, त्याच्या दुसऱ्या साथीदाराला सुद्धा पवई पोलिसांनी भादवि कलम ३२८, २७२, २७३, १८८ नुसार गुन्हा नोंद करून अटक केली. न्यायालयात हजर केले असता दोघांनाही पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे आणि पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी ही कारवाई केली.
No comments yet.