मुंबई पोलीस हे जगातील दुसऱ्या क्रमांकावर का आहे याची पुष्टी करणारी घटना नुकतीच पवई परिसरात समोर आली आहे. आपले कौशल्य दाखवत पवई पोलिसांनी पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणारे हे काम केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मुंबई पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच मुंबईकरांकडून सुद्धा त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
शिक्षिका असणाऱ्या प्रियांका साळुंखे यांनी सोमवारी पवईतील हिरानंदानी भागातून रिक्षा पकडली होती. आपल्या इच्छित स्थळी उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि, त्यांची लॅपटॉप बॅग कुठेतरी हरवली आहे. याबाबत त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
“माहिती मिळताच आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले,” असे याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.
साळुंखे यांनी आपल्या संपूर्ण दिवसाच्या कामाची आणि प्रवासाच्या दिलेल्या माहितीवरून रिक्षातच ती बॅग राहिली असल्याचे पोलिसांच्या समोर आले.
“आम्ही त्यांनी प्रवास केलेल्या संपूर्ण रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आम्हाला रिक्षाचा नंबर मिळून आला. त्याची संपूर्ण माहिती मिळवत आम्ही फुलेनगर येथून रिक्षा चालकाकडून लॅपटॉपसह बॅग ताब्यात घेत साळुंखे यांना परत केली.” असे यासंदर्भात बोलताना तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.
I never imagined this would be 1st ever tweet. But I am glad it is. Being a daughter of Mumbai police officer, I knew that I will find my lost laptop in no time. In matter of 30 mins these officers from Powai police stn found my laptop. As rightly said Sadarakshnay Khalanigranay pic.twitter.com/qRzxIORMk2
— Priyanka Salunkhe (@salunkhe_15) December 6, 2021
ते पुढे म्हणाले, “आपल्या रिक्षाने प्रवास करणारी ती महिला आपल्या रिक्षात बॅग विसरली आहे हे लक्षात येताच त्याने त्या महिलेचा शोध घेतला होता मात्र त्या मिळून न आल्याने त्याने बॅग आपल्याच ताब्यात ठेवली होती.
आपला लॅपटॉप परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच साळुंखे यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे कि, “हे पहिले ट्विट असेल असे नाही. पण मला त्याचा आनंद आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याने मला माहीत होते की माझा हरवलेला लॅपटॉप मला लवकरच सापडेल. पवई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी केवळ ३० मिनिटांत माझा लॅपटॉप शोधून काढत मला परत केला. सदरक्षणाय खलनिग्रहणाय”
या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी सुद्धा एका व्यक्तीची बॅग रिक्षात विसरली होती. ज्यात महत्वाच्या सामानासोबत लग्नासाठी खरेदी केलेले दागिनेसुद्धा त्याच बॅगेत होते. याबाबत त्या व्यक्तीने पवई पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी काही तासातच तिचा शोध काढत संपूर्ण सामानासह ती बॅग त्याच्या मालकाला परत मिळवून दिली.
No comments yet.