कोविड – १९ आजाराने जगभराला आपल्या विळख्यात घेतलेले असताना, नोविड कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरत जाणारया या आजाराला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने देशभर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. २५ मार्च पासून लागू झालेले संचारबंदी आदेश २१ दिवसांकरिता असणार आहेत. या कालावधीत फक्त जीवनाश्यक वस्तू, मेडीकल, दूध, भाजीपाला, फळे विक्री सारखी दुकाने सुरू ठेवण्याकरिता मुभा देण्यात आलेली आहे. मात्र याचाच फायदा घेत पवईतील काही भाजी आणि फळविक्रेते चढ्या भावाने सामान विक्री करत असल्याची तक्रार नागरिक करत होते. याची दखल घेत पवई पोलीस आणि पवई परिसरातील काही समाजसेवकांनी या विक्रेत्यांना प्रबोधन करत अशा गोष्टी टाळण्याची तंबी दिली आहे.
पवई विभागातील आयआयटी मार्केट, गोखलेनगर, चैतन्यनगर आणि आयआयटी मेनगेट परिसरात असणाऱ्या मार्केट भागात असणारे काही भाजी विक्रेते बाजार भावापेक्षा दुप्पट किमतीने भाजीपाला विकत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी यांनी पवईतील समाजसेवकांना केली होती.
पवईतील बलविर सिंह, कैलाश कुशेर, नितीन भावसर आणि रमेश जाधव या समाज सेवकांनी याबाबत पवई पोलिस ठाणेस देशावर आस्मानी संकट आले असताना काही विक्रेते चढ्या भावाने भाजीपाला विक्री करत असून, काळाबाजार करत आपली पोळी भाजणाऱ्या या विक्रेत्यांवर कारवाई करत समज घालण्याची विनंती केली होती.
यानंतर पवई पोलिसांसह पवईतील या समाजसेवकांनी या सर्व भागात फेरफटका मारत अशी लुट माजवणाऱ्या विक्रेत्यांची खबर घेत त्यांना ही लुट थांबवण्याची सक्त ताकीद देत त्यांच्याकडून येथून पुढील काळात अशी गोष्ट घडणार नसल्याची कबुली सुद्धा दिली. येथून पूढे असे कृत्य केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, यांची अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानदार व विक्रेते यांनी नोंद घ्यावी अशी सुचना सुद्धा पवई पोलिस ठाणेकडून देण्यात आली आहे.
“आज आम्ही पवई आयआयटी येथील भाजी मार्केटमध्ये सर्वत्र फिरून सर्व विक्रेत्यांना, भाजीवाल्यांना समजावून सांगितले आहे, पोलिसांना बोलावून दम ही देण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे” असे याबाबत पवई प्रेसवर बोलताना समाजसेवक कैलाश कुशेर यांनी सांगितले.
या संदर्भात बोलताना पवई प्रेसच्या माध्यमातून समाजसेवक बलबीर सिंग यांनी सांगितले कि, “आम्ही पोलिसांसोबत सर्व विक्रेत्यांना भेटत या अशा प्रासंगिक काळात अशा प्रकारचे कृत्य न करण्याची विनंती केली आहे. या बाबत पुन्हा तक्रार आली तर कठोर कारवाई सर्व पवईकर मिळून करू.”
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.