@प्रमोद चव्हाण | कोविड – १९ रुग्णांचा महाराष्ट्रातील वाढता आकडा पाहता आणि पुढील काळात रक्ताचा तुटवडा भासू शकतो याला पाहता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. दिवसरात्र खाकीच्या माध्यमातून मुंबईला सुरक्षा पुरवणाऱ्या आणि कायदा – सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पवई पोलीस ठाण्यात कार्यरत विजय घागरे, अंबादास काळेल, शिवराज कोळी यांनी पवईत आयोजित रक्तदान मोहिमेत रक्तदान करत अशाही पद्दतीने मुंबईकरांचे संरक्षण केले. एकदा रक्तदान केल्याने चौघांना जीवदान मिळते असे म्हटले जाते. त्यांच्या या कार्याबद्दल पोलीस प्रशासन आणि पवईकरांकडूनही कौतुक होत आहे. मुंबई पोलिस दलामध्ये काही असे पोलिस आहेत, जे आपले कर्तव्य चोख बजावतानाच रक्तदान करून अनेकांना जीवदान देतात.
कडक शिस्तीचे, फटकळ अशी प्रतिमा पोलिसांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात असते; परंतु खाकीमध्येही सहृदयी मनुष्य दडलेला असतो, हे या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कृतीतून समोर येते. या सत्कार्याबद्दल अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली आहे.
देशात कहर माजवणाऱ्या कोरोना वायरसशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. सध्या देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन असून, या काळात रक्ताची कमतरता जाणवण्याची शक्यता असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी छोट्या छोट्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर पवईत जैन मंदिर हॉलमध्ये रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या नेतृत्वात हिरानंदानी रुग्णालयाच्या साहय्यातून या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ७० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
सध्या राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असून, त्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे केवळ मुंबईतून आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांना आपल्या कर्तव्यावर हजर रहावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबईची कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी आणि अशा काळात कोणी गैरफायदा घेवू नये यासाठी मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून रक्षणाचे काम करत आहेत. हे काम करत असताना पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारासोबतच वेळ सोडा निटसा आराम मिळणे सुद्धा मुश्कील झाले आहे. मात्र आपले प्राण पणाला लावत कर्तव्य निभावण्याचे कार्य ही मंडळी करत आहेत. असेच कर्तव्य पार पाडत असताना पवई पोलीस ठाण्यात कार्यरत विजय घागरे, अंबादास काळेल, शिवराज कोळी सारखी मंडळी रस्त्यावर उभे राहत आपले खाकीतील कर्तव्य तर निभावातच आहेत सोबतच रक्तदान करून माणूस म्हणून समाजाचे आणि माणुसकीचे कर्तव्य सुद्धा निभावत आहेत. त्यांच्या या कार्यानंतर प्रत्येक पवईकराच्या तोंडून फक्त एकच शब्द येत आहेत “पांडू नाही पांडुरंग आहेत हे.”
रमेश कांबळे यांच्या माहिती सह
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.