घरातील पार्टीसाठी दारु मागविण्यासाठी वाईन्स शॉपचा नंबर ऑनलाईन शोधणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. दारु पाठविण्याच्या बहाण्याने ठगाने एका पायलट तरुणाच्या खात्यातील ३८ हजाराच्या रकमेवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करुन पवई पोलीस तपास करत आहेत.
पवईतील हिरानंदानी गार्डनमध्ये आपल्या कुटूंबासोबत राहत असलेला ३२ वर्षीय तरुण एअर इंडियामध्ये पायलट आहे. रविवारी नातेवाईक घरी आल्याने कुटूंबियांनी रात्री सेलिब्रेशन करण्याचे ठरविले. त्याच्या बहीणीनेच ऑनलाईन सर्च करुन हिरानंदानी गार्डन परिसरातील एका मोठ्या वाईन्स शॉपचा नंबर मिळविला.
नंबरवर कॉल करुन रेड वाईनची ऑर्डर देवून कॅश ऑन डिलीव्हरी करणार असल्याचे सांगितले. मात्र समोरून बोलणार्या व्यक्तीने कॅश ऑन डिलिव्हरी करत नसल्याचे सांगितले.
‘समोरील व्यक्तीने कार्डची माहिती द्या, दारु पाठवितो असे सांगितले. तरुणाने आपल्या कार्डची माहिती त्या व्यक्तीला देत मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सुद्धा त्याला दिला. काही क्षणातच खात्यातून दोन आर्थिक व्यवहार होत, प्रत्येकी १९ हजार रुपये डेबीट झाल्याचे संदेश त्याच्या मोबाईलवर आले.
काहीतरी गडबड असून, खात्यातून रक्कम जात असल्याचे लक्षात येताच त्याने बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करुन डेबीट कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले.
तरुणाने स्वत: वाईन शॉपमध्ये जाऊन चौकशी केली असता, त्यांनी ऑनलाईन दारु विक्री बंद केल्याचे सांगिल्याने तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली.
तरुणाने याबाबत पवई पोलिसात धाव घेत आपल्या खात्यातून फसवणूक करून ३८ हजार २ रुपये लांबवल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
No comments yet.