पवईतील लेक होम येथील लेक फ्लोरेंस इमारतीत एका श्वानाला (कुत्रा) एअर गनच्या साहय्याने मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच पवईत उघडकीस आली आहे. श्वानाच्या शरीरात एक्सरेमध्ये दोन एअर गनच्या पुलेट्स डॉक्टरांना मिळून आल्यानंतर ही घटना समोर आली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्वेता मुळीक या लेक होम येथील लेक फ्लोरेंस इमारतीत राहतात. त्यांच्या इमारतीत एक तांबडा रंगाचा श्वान, ज्याचे नाव ब्राउनी असे ठेवले होते. पाठीमागील ७ ते ८ वर्षापासून राहत आहे. त्या काही रहिवाशांच्या मदतीने येथील भटक्या कुत्र्यांची काळजी घेतात. २४ नोव्हेंबरला ब्राउनी आजारी वाटत असल्याने त्यांनी त्याला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेत उपचार सुरु केले होते.
५ डिसेंबरला तो जास्तच अशक्त वाटू लागला होता, त्याने खाणे पिणे ही सोडल्याने त्याला खार येथील योडा अनिमल शेल्टर येथे दाखल करण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याच्या काढलेल्या एक्सरेमध्ये डॉक्टरांना त्याच्या शरीरात २ एअरगनच्या पुलेट्स आढळून आल्या. ही माहिती समोर येताच सर्वांनाच धक्का बसला. उपचारा दरम्यान ११ तारखेला ब्राउनीचा मृत्यू झाला आहे.
“तक्रारदार यांनी याबाबत पोलीस ठाण्यात येवून तक्रार दाखल केली आहे. कोणीतरी एअरगनच्या साहय्याने या श्वानाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून परिसरात असणाऱ्या सिसिटीव्हीच्या मदतीने अधिक तपास करत आहोत,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“विशेष म्हणजे १ डिसेंबरला येथे पार्क करण्यात आलेल्या बजाज यांच्या कारच्या काचेला तडे गेले असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे याच दरम्यान कोणीतरी या श्वानावर सुद्धा हल्ला केला असल्याची शक्यता आहे,” असेही एक अधिकारयाने याबाबत बोलताना सांगितले.
लेकहोममध्ये घडणारी ही पहिली घटना नाही, यापूर्वीही काही वर्षापूर्वी एका रहिवाशाने आपल्या घरातील श्वानाच्या पिल्लाला घराच्या बाल्कनीतून खाली फेकल्याची घटना घडली होती. यात सदर इसमाला पवई पोलिसांनी अटक केली होती.
No comments yet.