@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण
भाजपाने मुंबई महापालिका जिंकण्याचा विडा उचलल्याने शिवसेना सर्वतोपरी दक्ष झाली आहे. भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून, दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अनेक शाखांना गुरुवारी भेट देऊन शिवसैनिकांना झपाट्याने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई भेटी दरम्यान त्यांनी पवईतील शाखा क्रमांक १२२ मध्ये येथील शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी पवईकर शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार म्हटल्यावर त्यांच्या स्वागतासाठी अनेक आजी- माजी शाखाप्रमुखांसह असंख्य महिला व तरुण शिवसैनिकांनी येथे अलोट गर्दी केली होती.
गेली अनेक वर्ष मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकावत ठेवणाऱ्या शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे एक द्वंद्व आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणूका दोन महिण्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच भाजप बरोबर असलेले प्रेमसंबंध तुटल्याने शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र आहे. याच सगळ्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर व भाजपाला येत्या निवडणुकीत शह देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. मुंबईतील शाखांना प्रत्यक्ष भेट देवून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे धोरण आखत त्यांनी शिवसैनिकांना झपाट्याने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
पवईत राजकीय भूकंपाची शक्यता
उद्धव ठाकरे यांच्या पवई भेटीचे औचित्य साधत राष्ट्रवादीचे नगरसेवक चंदन शर्मा यांनी ऐन निवडणुकीच्या गरमागरमीत उद्धव ठाकरेंना सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन दिलेल्या आलिंगनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, येथे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हि फक्त सदिच्छा भेट असल्याने कुणीही याचा राजकीय अर्थ काढून चुकीचा अंदाज बांधू नये असे दोन्हीकडच्या प्रतिनिधिंकडून सांगण्यात येत आहे.
पक्षप्रमुखांच्या या छोट्याशा भेटीने शिवसैनिकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी याचा निवडणुकीत किती फायदा होईल हे त्यावेळीच कळेल.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.