पाठीमागील अनेक वर्ष दुरावस्थेत असलेल्या पवई विहार कॉम्प्लेक्सच्या अंतर्गत रोडच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आवर्तन पवईने याबाबत पालिका आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. गेल्या आठवड्यात ‘पवई विहारचा रस्ता खड्यात; नागरिक विद्यार्थ्यांचे हाल’ अशा मथळ्याखाली बातमी करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले होते. खड्डे विषयक तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे भरण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिल्यानंतर अखेर गुरुवारी पालिकेतर्फे पवई विहार कॉम्प्लेक्समधील अंतर्गत रोडच्या कामाला सुरुवात झाली आहे.
पवई विहार येथील अंतर्गत रस्त्याला बनवण्याचा कामाचा शुभारंभ मोठा धुमधडाक्यात गाजावाजा करून करण्यात आला होता. मात्र केवळ ड्रेनेज लाईन जोडणे, केबल्स टाकणे अशी कामे करून, खड्डेमय रस्ता तसाच सोडण्यात आला होता. यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांची आणि येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच दैना होत होती. या मार्गावरून जाण्यास रिक्षावाले मनाई करू लागले होते. त्यामुळे रस्ता बनवणे सोडा किमान दुरुस्त तरी करा अशी मागणी नागरिकांकडून होत होती. आवर्तन पवईने याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत मुद्दा लावून धरला होता.
खड्डे विषयक तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्कालीन व्यवस्थापन विषयक बैठकीत पालिका आयुक्तांनी दिले आहेत. आदेश होताच गुरुवारी पालिकेने सगळ्या लव्याजम्यासह पवई विहार गाठत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
“सध्या तात्पुरत्या स्वरुपात पेवरब्लॉक लावून या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी काही काळासाठी हा रस्ता बंद करण्यात आला असून, वाहतूक वळवण्यात आली आहे,” असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण खड्ड्यातून नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना दिलास मिळणार असल्याने नागरिकांनी पालिकेच्या या कामाचे स्वागत करतानाच आनंद व्यक्त केला आहे.
No comments yet.