प्रमोद चव्हाण @pracha2005
उच्चशिक्षित असूनही चांगली नोकरी मिळत नाही आणि त्यामुळे लग्न ठरत नाही, या नैराश्यातून आयआयटी येथील पॅराडायज इमारतीत राहणाऱ्या जसकमल सेहगल (३०) या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल पवईत घडली. पवई पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंद केला असून ते अधिक तपास करत आहेत.
लंडन येथून एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर जसकमल आपल्या आईवडिलांसोबत आयआयटी येथील पॅराडायज इमारतीत पहिल्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये राहत होती. शिक्षण पूर्ण झाल्यापासून नोकरीसाठी तिचे प्रयत्न चालू होते, मात्र चांगली नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे ती निराश झाली होती. मंगळवारी घरात कोणीच नसताना तिने घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
“जसकमलचे वडील व्यावसायिक असून, आईवडील सकाळी ८.३० वाजता घरातून सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दुपारी बाराच्या दरम्यान जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांची मुलगी दरवाजा उघडत नाही हे पाहून त्यांनी त्यांच्या जवळील चावीने दरवाजा उघडला असता बेडरूममध्ये मुलीने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. त्यांनी त्वरित तिला स्थानिक खाजगी रुग्णालयात नेले पण तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “तिला नोकरी मिळत नसल्याने व लग्न ठरत नसल्याने ती मानसिक तणावात होती. उदासिनतेसाठी तिच्यावर उपचारसुद्धा सुरु होते. नैराश्येतून तिने हे पाऊल उचलले असणार, असे मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे. आम्ही आत्महत्येचा गुन्हा नोंद करून तिचा मोबाईल ताब्यात घेतला आहे आणि पुढील तपास करत आहोत.”
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.