देशभरात फोफावलेल्या कोरोना व्हायरस ने मुंबईत प्रवेश करत एका बाधिताचे प्राण घेतल्यामुळे मुंबईत नागरिक या व्हायरसमुळे भयभीत झाले आहेत. त्यातच भर म्हणून काल पालिका एस विभागाच्या हद्दीत एक रुग्ण सापडल्यामुळे या विभागातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी घाबरू नये, योग्य ती काळजी कशी घ्यावी? याबाबत पवईतील सजग जागृत तरुणांनी पुढे येत आज (मंगळवार १७ मार्च) आयआयटी पवई येथील रहिवाशी भागात कोरोना व्हायरस बद्दल जनजागृती केली.
पवईतील चौका चौकात उभे राहून कोरोना व्हायरस प्रार्दुभाव कसा टाळता येईल व नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन या तरुणांकडून करण्यात आले. पवईतील सर्व गल्लीबोळासह आसपासच्या हॉस्पिटलमध्ये जावूनही नागरिकांना जनजागृती करण्यात येणार असल्याचे या तरुणांकडून सांगण्यात आले.
यावेळी विरेंद्र धिवार, रमेश जाधव, रूकसाना शेख, संतोष गुप्ता, समाधान बिरारे, बिपिन देडीया, शिव गुप्ता, रमेश कांबळे सहभागी झाले होते.
मुंबईत सध्या या आजाराची दुसरी स्टेज आहे. हे पाहता याला पसरण्यापासून रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आधीच शाळा, सिनेमागृह, मॉल, जिम, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानांना बंद ठेवण्याची विनंतीही करण्यात आली आहे. मात्र पवईतील काही भागात आजही मंगळवार आणि गुरुवारी आठवडा बाजार भरत असतात. या बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने याचा वाढणारा धोका पाहता पवईतील काही जागृत तरुणांनी एकत्रित येत या आजाराशी सामना करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत माहिती दिली. तसेच नागरिक आणि दुकानादारांना इथून पुढील काळात मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होऊ नये म्हणून पुढील काही काळासाठी या बाजारापासून दूर राहण्याची विनंती सुद्धा केली.
No comments yet.