हिरानंदानी गार्डन्स पवई रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या (HGPRWA) सदस्यांनी हिरानंदानी पवईतील वाहतूक समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवार, १३ डिसेंबर रोजी वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन सिन्हा (Jt CP Traffic) आणि पोलीस उपायुक्त वाहतूक (पूर्व) (DCP Traffic East) राजू भुजबळ यांची भेट घेतली. असोसिएशनचे सदस्य मेलबिन व्हिक्टर, ललित मेहरा आणि रमेश अय्यंगर यांनी पवई परिसरातील विविध वाहतूक समस्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी दोन्ही वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई सुरू करण्याचे आश्वासन दिले तसेच याव्यतिरिक्त अजून काय उपाययोजना करता येतील यासाठी परिसराची पाहणी करणार आहेत.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (JVLR) सध्या सुरु असलेल्या ‘मेट्रो-६’च्या (Metro-6) कामामुळे संपूर्ण जेविएलआरवर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम पवईच्या अंतर्गत भागातही जाणवू लागला आहे, त्यामुळे अंतर्गत भागातही नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. याशिवाय पवईतील विविध भागात शालेय बसेस, शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची खासगी वाहने आणि रस्त्यावरच पालकांच्या गाड्या पार्किंगमुळेही या परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.
यासोबतच परिसरातील युवक वाहतुकीचे नियम मोडून भरधाव वेगाने वाहने रस्त्यावर चालवत असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकेरी मार्गावर वाहतूक पोलिस नसल्याने अनेकदा विरुद्ध दिशेने वाहने प्रवेश करतात. काही शाळा, महाविद्यालये आणि इतर परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स परिसरात युवक आपल्या कार, दुचाकी रस्त्यावर उभ्या करून संपूर्ण परिसराला वळसा घालून वाहतूक कोंडी निर्माण करतात. अशा अनेक वाहतूक समस्यांशी पवईकर सध्या झुंजत आहेत. या प्रश्नासंदर्भात असोसिएशनच्या सदस्यांनी वरळी येथील कार्यालयात सहआयुक्त वाहतूक आणि पोलीस उपायुक्त वाहतूक यांची भेट घेतली.
यावेळी सदस्यांनी हिरानंदानीतील वाहतुकीच्या विविध समस्या मांडून पवईतील आणखी काही वाहतूक समस्या सोडविण्याची मागणी केली. ईडन मार्केट रोड वन-वे नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. ईडन मार्केट परिसरातील पार्किंगची जागा योग्यरित्या दर्शविली गेली पाहिजे (योग्य सूचना फलक लावले पाहिजेत). वाहतूक शिस्तीसाठी ईडन मार्केट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, मात्र चलान तयार होत नाही. ईडन मार्केट परिसरात वाहतूक पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये टोइंग व्हॅन येत असली तरी ईडन मार्केट परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नाही. तरुण कॉम्प्लेक्समध्ये मोटारसायकल वेगाने पळवत, असह्य आवाज करत आहेत. संकुलात ३ शाळा असून, स्कूल बसेसच्या बेशिस्त पार्किंगमुळे दररोज वाहतूक कोंडी होते. अशा समस्यांचे पत्र त्यांनी यावेळी वाहतूक अधिकाऱ्यांना देत कारवाईची मागणी केली.
पवईवासियांच्या समस्या समजून घेत दोन्ही अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यासह उपायुक्त भुजबळ यांनी सदस्यांशी सविस्तर चर्चा करून इतर समस्याही सखोलपणे जाणून घेतल्या. तत्काळ कार्यवाही करून काही दिवसांत या भागास भेट देऊन समस्या समजून घेऊन इतर काय उपाययोजना करता येतील याची माहिती घेईन, असे आश्वासनही त्यांनी सदस्यांना दिले. पवई आणि चांदिवली भागातील समस्या सोडविण्यासाठी काम करण्यासही ते उत्सुक आहेत.
No comments yet.