इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये पवईच्या मुलांची छाप, टॉप १४ मध्ये निवड

पवईच्या मुलांनी कला क्षेत्रात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवत सोनी टेलिव्हिजनवर सुरु असणाऱ्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रियालिटी शोमध्ये टॉप १४ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले आहे. पवईच्या मुलांचा सहभाग असणाऱ्या ‘डिमॉलिशन क्रू’ने हे स्थान मिळवत पवईच्या नावाचा झेंडा अजून उंचावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित एक प्रसंग आपल्या कलेतून सादर करत मुलांनी हे स्थान कमवले आहे.

सोनी टीव्ही नवीन जज आणि स्पर्धकांसह टॅलेंटवर आधारित भारतातील सर्वात आवडता रियालिटी शो इंडियाज गॉट टॅलेंट (IGT 2022) घेऊन परतला आहे. इंडियाज गॉट टॅलेंटचा हा नवीन सीझन १५ जानेवारीपासून सुरू झाला असून, हा या शोचा ९ वा सीजन आहे. या सीझनमध्ये किरण खेर, बादशाह (गायक), शिल्पा शेट्टी (अभिनेत्री) आणि मनोज मुनताशीर (कवी/पटकथा लेखक) हे स्पर्धकांना जज करत आहेत. तर अभिनेता अर्जुन बिजलानी याचे सूत्रसंचालन करत आहे. या वर्षीच्या शोचे पवईकरांसाठी एक खास आकर्षण म्हणजे या शोच्या टॉप १४ स्पर्धकांमध्ये पवईच्या मुलांचा सहभाग असणारा ‘डिमॉलिशन क्रू’ समाविष्ट आहे. पुढील २ महिने ही मुलांची टीम या शोच्या विजेतेपदासाठी आपल्या नृत्याच्या माध्यमातून आपली कला टेलिव्हिजनच्या माध्यमातून जगासमोर सादर करणार आहे.

पवईच्या मुलांची ‘वि इलेव्हन’ ही डान्सिंग टीम आणि अंबरनाथ येथील ‘तोडफोड’ टीम मुंबईत अनेक डान्सिंग स्पर्धांमध्ये आळीपाळीने आपली चमक दाखवत कधी ‘वि इलेव्हन’ तर कधी ‘तोडफोड’ टीम प्रथम स्थान पटकावत होती. मात्र यामुळे फक्त मुंबई किंवा महाराष्ट्र पातळीला मर्यादित न राहता जागतिक स्तरावर भारताचे नाव घेवून जाण्यासाठी ही दोन्ही टीम एकत्रित येत तयार झाले ते ‘डिमॉलिशन क्रू’.

इंडियाज गॉट टॅलेंटच्या नवीन सिजनमध्ये डिमॉलिशन क्रूने पहिल्याच फेरीत बॉलीवूडच्या गाण्यावर चित्तथरारक नृत्य सादर करत भारतभर ऑडीशनमधून निवडलेल्या ६२ टीम आणि वैयक्तिक स्पर्धकांमध्ये आपली चमक दाखवत निवड मिळवली. पुढील भागात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील ‘अफजलखानाचा वध’ या विषयाला आपल्या नृत्याच्या कलेतून सादर करत जजेसच्या मनावर आपले प्रतिबिंब कोरत टॉप १४ मध्ये आपले स्थान अढळ केले.

पुढील २ महिने ही स्पर्धा चालणार असून, डिमॉलिशन क्रू आपल्या नृत्याच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्यासोबतच या शोचे प्रथम स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा करणार आहे.

प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर हा शो पाहता येणार आहे. आपल्या पवईतील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा शो नक्की बघाच शिवाय त्यांना वोटिंग करायला अजिबात विसरू नका.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!