कोरोनाच्या या दुर्दैवी काळात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आपल्या बांधवांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणण्यासाठी पवईतील ४ विद्यार्थ्यांचे हात एकवटले आहेत. या कठीण प्रसंगी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी ६४,००० हजार रुपये जमा केले असून, त्यातून त्यांनी २०० कुटुंबाना रेशन पुरवले आहे.
महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला शिकणारे अनुषा गुहा, कॅथरीन मॅथ्यूज, जोशुआ डिसोझा आणि सॅम्युएल नॉक्स हे सर्व ‘प्रोजेक्ट उल्हास’ अंतर्गत हा उपक्रम राबवत आहेत. हे सर्वच सर्व विद्यार्थी पवईतील रहिवासी असून माहीम येथील बॉम्बे स्कॉटीश स्कूलमध्ये शिकत आहेत.
प्रकल्प उल्हास अंतर्गत त्यांनी एकूण ६४ हजार रुपये यशस्वीरित्या जमा करत कुटुंबांना २ किलो तांदूळ, १ किलो डाळ, २ किलो पीठ आणि मीठ असलेले मूलभूत रेशन पॅकेट्स दिले आहेत. पवईतील तुंगागाव येथील गरीब कुटुंबाना १४३ पाकिटे तर ‘लिटल सिस्टर्स ऑफ द पुअर’ वृद्धाश्रमात ७५ पाकिटे या विद्यार्थ्यांतर्फे दिली गेली आहेत.
“कोरोना काळात अनेकांची आर्थिक घडी बिघडली आहे. आपल्या घरात, कार्यालयात किंवा आसपास सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती सध्या खराब आहे. अशावेळी आपण काहीतरी करायला हवे, असा विचार आमच्या मनात आला आणि ‘प्रोजेक्ट उल्हास’ अंतर्गत या कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आम्ही डोनेशन जमा करण्यास सुरुवात केली. आज आम्ही किमान २०० कुटुंबांचे आणि विशेषतः वृद्धाश्रमातील लोकांना मदत करू शकलो याचा आम्हाला खूप आनंद आहे,” असे याबाबत बोलताना या विद्यार्थ्यांनी सांगितले.
या यंगस्टर्सनी मनापासून केलेला हा उपक्रम निश्चितच एक स्तुत्य आहे. सर्वांना विनंती आहे की अशा कठीण काळात गरीब गरजूंना मदत करण्यासाठी जे काही शक्य असेल त्यामध्ये योगदान द्या.
No comments yet.