रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४१ पुरस्कृत स्पर्धा २८ आणि २९ जानेवारीला घेण्यात आली.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टकडून इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पवईमध्ये २८ आणि २९ जानेवारीला विज्ञानस्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरी आणि दुर्गम भागातील ग्रामीण शाळांसह एकुण ६२ शाळांनी भाग घेतला होता. रोटरी क्लब ऑफ बाँबे पवई, रोटरी कल्ब ऑफ मुंबई लेकर्स आणि रोटरी क्लब ऑफ बाँबे या तीन क्लबचा या आयोजनात पुढाकार होता.
पवईच्या हिरानंदानी शाळेजवळच्या मैदानावर २८ आणि २९ जानेवारी या दोन दिवशी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात आपला विज्ञान प्रकल्प आणि मॉडेल सादर करणार्या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट कल्पना आणि त्यांचे आकर्षक सादरीकरण यासाठी दिली जाणारी अनेक पारितोषिके मिळवायची संधी मिळाली.
जगभरात शिक्षण क्षेत्रात नवे वारे वाहत आहेत आणि त्यात काही आमुलाग्र बदल होताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना आज डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख होते आहे. त्यातून प्रयोग, शोध आणि नवनिर्मिती यांचा मार्ग खुला झालेला आहे. पुढच्या दशकात, जगभरातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा संपूर्ण वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची संधी मिळावी या हेतूने पवईमध्ये ‘रोटासायन्स’ विज्ञानस्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना त्यांची कल्पनाशक्ती विस्तारित करण्यास प्रोत्साहित केले. ज्यातून विज्ञानाचा आणि भविष्यातल्या तंत्रज्ञानाचा खोलवर आणि सर्जकतेने विचार करून काही नवी निर्मिती पाहण्यास मिळाली. आपल्या रोजच्या जीवनातला एखादा प्रश्न घेऊन त्यावर विज्ञानावर आधारित उपाय शोधून काढण्याची संधी या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाली. त्यासाठी प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संघटितपणे काम केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने निर्मित केलेली आणि देशाचे भविष्य ठरणारी अनेक मॉडेल्स या प्रदर्शनात ठेवली गेली होती. प्रदर्शनाला भेट देणार्या प्रेक्षकांना त्यांची माहिती देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
हे मॉडेल बनवण्यासाठी पुन्हा वापरता येणारे प्लॅस्टिक, पुठ्ठा किंवा इतर पुन्हा वापरात येणाऱ्या गोष्टींचा वापर करून वस्तू बनवण्यात आल्या होत्या. मुलांनी बाजारात आयत्या मिळणार्या आणि महागड्या गोष्टी वापरण्यापेक्षा उपलब्ध आणि पुन्हा वापरता येणाऱ्या साधनांमधून एखादी वैज्ञानिक संकल्पना कशी स्पष्ट करता येईल याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे होते आणि येथे प्रदर्शित प्रत्येक निर्मितीत ते पाहावयास मिळाले. विज्ञान प्रकल्पासाठी ज्या शाळांना काही मार्गदर्शनाची आवश्यकता होती, त्यांना तशा प्रकारची मदत रोटरी सदस्यांकडून केली गेली.
पाठीमागील दोन महिने या प्रदर्शनीसाठी पवई रोटरी क्लबमधील कार्याध्यक्ष विवेक गोविलकर, कार्याध्यक्षा सविता गोविलकर, मुंबई रोटरी उप गवर्न्रर राजेंद्र उन्निक्रीष्णन, घाटकोपर क्लबमधील कार्याध्यक्ष जयेश बदानी, श्रुती धरमसी आणि पिल्ले यांनी ६२ शाळांना एकत्र आणून त्यांच्या प्रयोगांची छाननी करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. पवई क्लबच्या अध्यक्षा कल्पना जयशंकर आणि मंजू उधासी यांचा या कार्यात विशेष सहभाग होता. शाळांची आणि प्रयोगांची निवड करताना समाजातील विविध स्तरांचा यामध्ये समावेश होईल याची विशेष काळजी घेण्यात आली होती.
No comments yet.