पवई येथील शिपिंग रिक्रूटमेंट कंपनीच्या कार्यालयातून ₹८४ लाख किंमतीची सोन्याची नाणी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ९ ऑगस्ट रोजी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने तिजोरी तपासली असता लॉकरमधून सोन्याची नाणी गायब असल्याचे आढळून आले.
जगभरातील विविध शिपिंग-संबंधित कंपन्यांच्या आवश्यकतांनुसार जहाज क्रूची नियुक्ती आणि व्यवस्थापन करणाऱ्या पवईतील शिपिंग रिक्रुटमेंट कंपनीचे संचालक व महाव्यवस्थापक यांनी याबाबत पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करत एका कर्मचाऱ्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
सदर कंपनी दरवर्षी, कंपनीत ५ ते २० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना २ ते २० ग्रॅम वजनाची सोन्याची नाणी बक्षीस म्हणून वितरित करत असते. या कार्यासाठी १२ कर्मचाऱ्यांचा एक स्वतंत्र विभाग या कंपनीत काम करतो.
प्रत्येक वर्षी नाणी वितरीत केल्यानंतर उरलेली सोन्याची नाणी चालू वर्षाची नाणी असलेल्या लाकडी कपाटात लॉकरमध्ये ठेवली जातात. ९ ऑगस्टला एका कर्मचाऱ्याला कार्यालयातील लाकडी तिजोरीतून सोन्याची नाणी गायब असल्याचे समोर आल्यावर त्याने कंपनीचे संचालक व महाव्यवस्थापक राहुल दुधाडे यांना याबाबत माहिती दिली.
रेकॉर्ड तपासले असता २ ते २० ग्रॅम वजनाची २८५ सोन्याची नाणी गायब असल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात सर्वत्र शोध घेतला, मात्र सोन्याची नाणी सापडली नाहीत. यानंतर पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
“तपासात सक्तीच्या प्रवेशाची कोणतीही चिन्हे नसल्यामुळे, बाहेरील व्यक्तीचा सहभाग दिसून येत नव्हता. ज्यामुळे नाणी ठेवण्यात आलेल्या तिजोरीची चावी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांकडे आम्ही चौकशी सुरु केली.” यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याचे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
तपासा दरम्यान या कंपनीतील कर्मचारी रोबर्ट फर्नांडीस याच्याकडे चौकशी करत असताना तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता. “त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जवळपास २ वर्षाच्या कालावधीत थोडे-थोडे करून त्याने नाणी चोरी केली होती,” असे पवई पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
“अटक आरोपी हा स्वतः या नाण्यांचा व्यवहार पाहत असल्याने त्याच्या कार्यकाळातील सर्व व्यवहार कंपनीकडून परत तपासले जात आहेत. कंपनीचा अहवाल आल्यावरच चोरी केलेल्या नाण्यांची संख्या आणि त्यांची किंमत स्पष्टपणे समोर येईल.” असे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयदीप गोसावी म्हणाले.
मौजमस्तीसाठी करायचा चोरी
“आरोपीच्या चौकशीत त्याने ही नाणी चोरी करून विकल्याचे उघडकीस आले आहे. विकून मिळालेला पैसा हा त्याने दारूवर आणि मौजमस्ती करण्यासाठी उधळला असल्याचे सांगितले. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे,” असे गुन्हे प्रकटीकरण अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय न्याय संहिता कलम ३०६ (चोरी) अंतर्गत दाखल गुन्हात फर्नांडीस याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
No comments yet.