मुंबईच्या विविध भागातून मुले चोरी होत असल्याच्या अफवा पाठीमागील काही दिवसांपासून वाढत चालल्या असून, यामुळे पालकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. मात्र सोशल माध्यमातून फिरणारी ही सगळी माहिती एक अफवा असल्याचे समोर आले आहे. याबाबत उपयुक्त परिमंडळ ७ यांनी व्हिडीओ स्टेटमेंट सुद्धा प्रसिद्ध केले आहे. पवई पोलिसांनी देखील आवर्तन पवईशी बोलताना अशी कोणतीच घटना पवईमध्ये घडली नसल्याची पुष्टी केली.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुले चोरणारी टोळी सक्रीय झाली असल्याचे व्हिडिओ आणि ऑडीओ संदेश व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच पवईतील एका शाळेतून मुलाचे अपहरण झाल्याचे संदेश शाळेच्या मुख्याध्यापकांपासून संपूर्ण मुंबईत व्हायरल झाले होते. याबाबत पवई पोलिसांनी शाळेत जावून माहिती मिळवली असता असे काहीच घडले नसल्याचे समोर आले. तसेच तपासात एका खाजगी शिक्षिकेने हा संदेश व्हायरल केल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेनंतर पवईतील अनेक शाळांच्या विद्यार्थी पालकांच्या ग्रुपवर फिरणारे संदेश पाहता जनजागृती निर्माण व्हावी, तसेच शालेय वेळात मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पवईतील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत पोलिसांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्या दालनात वपोनि बुधन सावंत यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली.
‘शाळेत शालेय बस, खाजगी वाहने आणि चालत येणाऱ्या मुलांच्या दृष्टीकोनातून घ्यावयाची खबरदारी. विद्यार्थी शालेय आवारात असताना घ्यावयाची खबरदारी. अनोळखी व्यक्तीला शालेय प्रांगणात प्रवेश नाकारणे. शालेय आवारात मुलांची सुरक्षा. पालक – शिक्षक संघटनेच्या माध्यमातून पालकांमध्ये जनजागृती. खोटे संदेश पसरू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी अशा विविध विषयांवर यावेळी पोलिसांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापकांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांकडून अपेक्षित सहकार्याची मागणी केली,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी आवर्तन पवईला सांगितले.
ते पुढे म्हणाले “लवकरच आम्ही विविध शाळांमध्ये जावून मुलांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी मार्गदर्शन करणार आहोत.”
No comments yet.