साकीनाका येथील अरिहंत इंडस्ट्रीजमध्ये असणाऱ्या एमएमपीएम या कंपनीची भिंत तोडून लाखोंचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरुन नेणाऱ्या ३ आरोपींना साकीनाका पोलिसांनी अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत. इमरान मेहरान शेख (१९) आणि अक्षय शर्मा (२४) अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांचा अजून एक साथीदार दिनेश दुमडिया मात्र फरार आहे. साकीनाका पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत केली आहे.
कंपनीचे मालक जय ढेबे सकाळी कंपनीत आले असताना त्यांना कंपनीतून मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक सामान गायब असून, भिंतीला भगदाड पडले असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी तात्काळ साकीनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करत १४६ मोबाईल, ५ टीव्ही, ४ होम थिएटर, एलईडी ट्यूब, फॅन असे जवळपास १८ लाख किमतीचे साहित्य चोरी करुन नेले होते.
परिमंडळ १० पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) रमेश नांगरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख (साकीनाका पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि लिलाधर पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांची एक टिम तयार करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या तीन तासात इमरान आणि अक्षयला पोलिसांनी क्रांतीनगर झोपडपट्टी येथून बेड्या ठोकल्या आणि सर्व चोरीला मालही हस्तगत केला.
“अटक आरोपींपैकी इमरान हा इलेक्ट्रिशियन असून, इंडस्ट्रीजच्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टीत राहतो. इंडस्ट्रीजमध्ये ये-जा करत असल्याने या कंपनीत इलेक्ट्रॉनिक साहित्य आणले जात असल्याची माहिती त्याला होती,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
भादवि कलम ३८०, ४५४, ४५७ नुसार गुन्हा नोंद करून साकीनाका पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या अजून एक साथीदाराचा शोध सुरु आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.