मुंबईतील पवईमध्ये रहावयास असणाऱ्या एका विद्यार्थ्याला सायबर चोरट्यांनी ४५,००० रुपयाला गंडवले आहे. सायबर चोरट्याने दिल्लीहून त्याचा मेहुणा बोलत असल्याचा दावा करत तक्रारदार यांना फसवले आहे. तक्रारदार राहुल अग्रवाल (२२) यांनी आपल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, फोन करणार्याचा आवाज त्यांच्या मेहुण्यासारखा नसल्यामुळे संशय आला होता, परंतु कॉलरने दावा केला की, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून, सर्दीमुळे त्याचा आवाज कर्कश झाला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पवई पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनलाईन फसवणुकीत ही एक नवीन पद्दत असून कोविड झाल्याचा बहाणा करून ज्याद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. दिल्लीत स्थित अग्रवाल गेल्या महिनाभरापासून पेइंग गेस्ट म्हणून पवई परिसरात राहत आहे. ड्रामा स्कूलचा विद्यार्थी असलेल्या अग्रवालने दावा केला आहे की त्याच्याकडे त्याच्या मेहुण्याचा नंबर नव्हता. मात्र कॉलरने दिलेल्या कोविडच्या कारणाने त्याला खात्री पटली आणि त्याने पैसे हस्तांतरित केले. अग्रवाल यांनी गुरुवारी लेखी स्वरुपात दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फोन केलेल्या कॉलरने स्वतःची ओळख त्याचा मेहुणा हर्ष अशी केली आणि कुटुंबातील इतर सदस्यांची माहितीही दिली. त्याला पैशांची गरज असून त्याच्या खात्यात काही समस्या असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, तो एका क्लायंटकडून येणाऱ्या पैशांची वाट पाहत आहे आणि त्याच संध्याकाळी तो ती रक्कम परत करेल. अग्रवालला त्या संध्याकाळी उशिरापर्यंत पैसे मिळू शकले नाहीत म्हणून, त्यांनी दिल्लीतील आपल्या मेहुण्याला फोन केला असता कळले की त्यांनी कधीही पैसे मागण्यासाठी फोन केला नव्हता.
अग्रवाल यांच्या मुंबई येथील राहण्याच्या आणि इतर खर्चासाठी ठेवण्यात आलेल्या रक्कमेवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
“आम्ही सेलफोन सेवा प्रदाता कंपनीकडून कॉल डेटा रेकॉर्ड आणि पैसे हस्तांतरित झालेल्या बँक खात्याचे तपशील मागवली आहेत,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कलमांखाली फसवणूक आणि ओळख चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments yet.