केंद्र सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १ ऑक्टोबर रोजी एक तास श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचे राष्ट्रीय पातळीवर आयोजन केले होते. पवईमध्ये पवई पोलिसांतर्फे आयोजित कार्यक्रमात मुंबई पोलीस, एनएसजी कमांडो, शालेय विद्यार्थी, आमदार दिलीप लांडे आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले कलाकार हर्षदा खानविलकर आणि संजय नार्वेकर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे आणि पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला.
‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय अभियाना अंतर्गत मुंबईकरांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने महनगरपालिका प्रशासनातर्फे रविवारी सकाळी १० ते ११ या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात मुंबईतील सुमारे १७८ ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस संयुक्तरित्या हा उपक्रम राबवण्यात आला.
पवईमध्ये विविध नागरी संघटना, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, राजकीय प्रतिनिधी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेचे सकाळी ७ ते १० या वेळेत आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये उद्याने, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, आदी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या सर्वात आकर्षण ठरले ते पवई तलाव विसर्जन घाटावर बृहन्मुंबई पोलीस परिमंडळ १० अंतर्गत पवई पोलिसांतर्फे आयोजित स्वच्छता मोहीम. या उपक्रमात पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे) जितेंद्र सोनावणे, पोलीस निरीक्षक विजय दळवी, पोलीस निरीक्षक गणेश पाटील, स्थानिक आमदार दिलीप लांडे, एनएसजी कमांडो, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, अभिनेते संजय नार्वेकर, मोठ्या प्रमाणात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी सहभागी लोकांनी पवई तलाव परिसर साफ करण्यासोबतच सहभागी नागरिकांना स्वच्छता विषयक प्रतिज्ञा, प्लास्टिक बंदी आणि शून्य कचरा याबाबत शपथ देण्यात आली.
यावेळी बोलताना कलाकार हर्षदा खानविलकर म्हणाल्या, स्वच्छतेची सवय ही लहानपणापासूनच लागायला हवी. याची सुरुवात घरातून आणि आईवडिलांच्या माध्यमातून होते. आपले घर आणि आपला परिसर आपण नियमित स्वच्छ ठेवला तर बऱ्याच समस्यांपासून आपण वाचू शकतो.
मॉर्निंग वोकेर्सनी केली हेरीटेज उद्यानात स्वच्छता
हिरानंदानी येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानात (हेरीटेज उद्यान) मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या स्वयंसेवक पवईकरांनी सकाळी या उद्यानात सफाई करत शासनाच्या स्वच्छता ही सेवा उपक्रमात सहभाग नोंदवला.
चांदिवलीकरांचा स्वच्छतेचा जागर
चांदिवलीतील सार्वजनिक उद्यानासमोरील कचरा साफ करण्यासाठी बीएमसीच्या निष्क्रियतेला कंटाळून चांदिवलीकरांनी हा प्रश्न स्वतःच्या हातात घेत रविवारी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिकेने स्वच्छता मोहीम सुरू केली. मात्र, चांदिवलीवासियांना या मोहिमेचा फायदा झालेला दिसत नाही. मीनाताई ठाकरे मैदानासमोर आणि रुग्णालयासमोर कचरा टाकला जात असल्याचा मुद्दा ते वारंवार उपस्थित करत आहेत, परंतु पालिका वारंवार आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.
No comments yet.