चांदिवली येथील प्रभाग क्रमांक १५६च्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर आणि प्रभाग क्रमांक १२१च्या माजी नगरसेविका चंद्रावती मोरे शिंदे समर्थकात सहभागी झाल्या आहेत. दोघींनीही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे समर्थकांना धक्का बसल्याचे म्हटले जात असतानाच ठाकरे समर्थकांनी याला संपूर्णपणे नाकारले आहे. उलट त्यांच्या जाण्याने तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
२०१७ निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर प्रभाग क्रमांक १२१ मधून पहिल्यांदाच निवडून आलेल्या चंद्रावती मोरे यांनी परिसरात जनहिताची कामे करत सर्वांची मने जिंकली आहेत. मोरे यांच्यासह स्थानिक शाखाप्रमुख मनीष नायर यांनी गेल्या आठवड्यात शिंदे यांना समर्थन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हातात घेतला. या पाठोपाठ चांदिवली येथील प्रभाग क्रमांक १५६च्या उध्दव ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी पती आणि उपविभागप्रमुख अशोक माटेकर, शाखाप्रमुख नितीन चव्हाण यांच्यासह शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन्ही माजी नगरसेविकांचे पक्षात स्वागत करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच चांदीवली आणि पवई क्षेत्रातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय शिरसाठ, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर आदी उपस्थित होते.
माजी नगरसेविका यांच्यासह उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते जाण्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. मात्र ठाकरे समर्थकांनी याला साफ नाकारतानाच त्यांच्या जाण्याने ठाकरे समर्थकांना कसलेही नुकसान झालेले नाही उलट त्यांच्या जाण्याने नवीन, तरुण आणि काम करणाऱ्या लोकांना संधी मिळणार असल्याचे पवईतील उद्धव ठाकरे समर्थकांनी सांगितले.
No comments yet.