ऑनलाईन फसवणूकीत एका ज्येष्ठ नागरिकाने गमावलेले ७४,५०० रुपये काही तासातच साकीनाका पोलिसांनी कारवाई करत परत मिळवून दिले आहेत. घर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट ब्रोकरच्या माध्यमातून कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून, लष्करात अधिकारी असल्याचे सांगत महिलेने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली होती.
पोलिसांच्या या कारवाईची प्रशंसा करताना ज्येष्ठ नागरिक यांनी मुंबई पोलिस दलाची स्कॉटलंड यार्डशी तुलना केली आहे.
सुजित गोस्वामी हे चांदिवली नहार येथे असणारा आपला फ्लॅट विकायला किंवा भाड्याने देण्यासाठी मुंबईत आले होते. बुधवारी त्यांना एका रिअल इस्टेट ब्रोकरने फोन करून त्याच्याकडे एक ग्राहक असल्याची माहिती दिली. फ्लॅट भाड्याने घेण्यास इच्छुक असलेल्या महिलेबरोबर कॉन्फरन्स कॉल जोडून दिला.
गोस्वामी यांना महिलेने आपली ओळख सुनिता कुमारी असे करून देतानाच ती लष्करात अधिकारी असल्याचे सांगितले. ती पुण्यात तिचा पती व मुलाबरोबर राहत असल्याचे सांगितले. तिने आपले गणवेशातील ओळखपत्रही शेअर केले. त्यानंतर तिने वारंवार फोन करून तिला हे घर हवे असून, २ लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आणि ५०,००० रुपये पहिल्या महिन्याचे भाडे देण्याच्या बहाण्याने विश्वासात घेत बँकेचा तपशील आणि ओटीपी सामायिक करण्यास सांगितले.
“त्यांच्या खात्यातून अनेक व्यवहारांच्या माध्यमातून ७४,५०० हस्तांतरित झाले असल्याचा संदेश प्राप्त होताच त्यांनी ताबडतोब साकीनाका पोलिसांत तक्रार दाखल केली”, असे पोलिसांनी सांगितले.
साकीनाका पोलिसांनी या व्यवहाराची तात्काळ माहिती मिळवत व्यवहार थांबवून रक्कम परत गोस्वामी यांच्या खात्यात परत केली. “आमच्या सायबर पथकाने वेगवान काम करत व्यवहार रोखले आणि सर्व रक्कम वसूल करण्यात यश मिळवले,” असे याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत देशमुख यांनी सांगितले.
No comments yet.