आपल्या मित्रांना पाहून अलिशान जीवन जगण्यासोबतच सुखवस्तू मिळवण्यासाठी २ अल्पवयीन मुलांनी पवई, हिरानंदानी येथील एका उच्चभ्रू इमारतीत फ्लॅट फोडून ३.४५ लाखाचे सोन्या हिऱ्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यातील एक नीट परीक्षेची (NEET) तयारी करत आहे तर दुसरा इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. दोघेही सधन कुटुंबातील असून, चांदिवली आणि हिरानंदानी येथील नामांकित शाळेतील विद्यार्थी आहेत.
आरोपी मनी हाइस्ट’ या क्राईम ड्रामा मालिकेपासून प्रेरित होते. यातील कथानक पाहून प्रेरित होत आलिशान जीवन जगण्यासोबतच मौल्यवान सुखवस्तू खरेदी करण्यासाठी या दोघांनी हा गुन्हा केला असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दोघांकडून चोरीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी, पवई येथील राज ग्राइंडर इमारतीत राहणाऱ्या फिर्यादी घरात नसताना त्याच्या फ्लॅटमध्ये घुसून सोने, हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ३.४५ लाखाची अज्ञात व्यक्तींने चोरी केल्याचा गुन्हा फिर्यादी यांनी पवई पोलीस ठाण्यात दाखल केला होता.
“तपासादरम्यान इमारतीत काम करणाऱ्या कामगारांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले होते. तसेच सीसीटीव्ही फुटेज वारंवार तपासल्यानंतर आरोपींची ओळख पटली होती.” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.
“ताब्यात घेत अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांसमोर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली,” असे आवर्तन पवईशी बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी संतोष कांबळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “बाल्कनीतून आत येत त्यांनी बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून घरात प्रवेश करत ही चोरी केली.”
त्यांच्या चौकशीत असे आढळून आले आहे की, यातील एक हा १७ वर्षांचा असून, चांदिवली येथील एका महाविद्यालयात १२ वीत शिक्षण घेत आहे. दहावीच्या परीक्षेत त्याला ९३ टक्के गुण मिळाले असून, तो वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) परीक्षेची तयारी करत आहे. त्याचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये असून कुटुंब कांजूरमार्ग पूर्व येथील एका भव्य इमारतीत राहते.
तर दुसरा १५ वर्षांचा असून तो हिरानंदानी येथील नामांकित शाळेत नववीत शिकतो. त्याच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, तो देखील एका सधन कुटुंबातील आहे.
No comments yet.