या प्रकरणात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाची मुंबईकरांची मागणी.
मेट्रो-६ (स्वामी समर्थ नगर – विक्रोळी) या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यानंतर नागरिकांच्या सूचना आणि आक्षेप मागवले होते. यासाठी घेतलेल्या बैठकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवत आक्षेप आणि सूचना नोंदवल्या, मात्र दोन महिने उलटूनही त्याच्यावर एमएमआरडीएकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
एमएमआरडीएच्या या वेळखाऊपणा आणि आळशीपणामुळे चिडलेल्या नागरिकांनी आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
मेट्रो-६ लाईन पश्चिमेला स्वामी समर्थनगर, लोखंडवालापासून सुरू होत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून (जेव्हीएलआर) पूर्वेकडील पूर्व धृतगती मार्गाजवळ संपते.
या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी २१ मे रोजी बैठक घेवून प्राधिकरणाने नागरिकांच्या सूचना, आक्षेप नोंदवून घेतले आहेत. त्यानंतर बैठकीचा वृतांत आणि आक्षेपांचे निराकरण होणे अपेक्षित होते. मात्र या बैठकीला दोन महिने उलटूनही याबाबत नागरिकांना काहीच कळवण्यात आलेले नाही. त्यामुळे या बैठका म्हणजे कागदी पूर्तता आहेत की काय? अशी शंका मुंबईकर उपस्थित करत आहेत.
मेट्रो-६ लाईन जेव्हीएलआरवरून घेवून जाण्याऐवजी मरोळनाका, साकीविहार मार्गे चांदिवली आणि विक्रोळीला पूर्व धृतगती मार्गावर संपवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.एमएमआरडीएने २१ मे रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी नागरिकांनी प्राधिकरणाने नागरिकांच्या सूचना घेण्यापूर्वीच काम सुरु केल्याबद्दल आपली नाराजी दर्शवली होती. यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना एका महिन्यात उत्तर देवू असे सांगितले होते, मात्र दोन महिने होत आले तरी याबाबत कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
या बैठकीच्या मिनिटावर अजूनही प्रक्रिया सुरू आहे. “वृतांतावर काम सुरु आहे, अंतर्गत मंजुऱ्या मिळताच आम्ही ते वेबसाइटवर प्रकाशित करू,” असे याबाबत बोलताना एमएमआरडीएचे संयुक्त प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.
“रहिवाशांनी अनेक आक्षेप आणि सूचना व्यक्त केल्या आहेत. आम्हाला सांगितले गेले होते की एका महिन्यात बैठकीचा वृतांत प्रकाशित होईल. जर एमएमआरडीए या मागण्यांचा विचार करणार नसेल तर मग सूचना आणि आक्षेप मागवण्याचा उपयोग तो काय?” असे याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
No comments yet.