पवई पोलिसांच्या हद्दीत दोन कोरोना बाधीत रुग्णांची भर

पवई पोलिसांच्या हद्दीत दोन कोरोना बाधीत रुग्णांची भरराज्यात १७ एप्रिल २०२० रोजी ११८ नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून, एकूण बाधितांची संख्या ३३२० झाली आहे. यात दोन रुग्णांची भर ही पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या मिलिंदनगर आणि अशोकनगर भागातून झाली आहे. या आकड्यांसोबतच पवई पोलीस ठाणे हद्दीतील रुग्णांची संख्या ९ वर पोहचली आहे. ९ पैकी २ रुग्ण मरोळकडील भागातील तर ७ रुग्ण पवई परिसरातील आहेत. पवई परिसरातील ६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

पवईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडला (जेविएलआर) लागून असणाऱ्या दीड ते दोन हजार नागरिकांची लोकवस्ती असणाऱ्या परिसरात आज सकाळी एक ४८ वर्षीय पुरुष कोव्हीड-१९ पॉझिटीव्ह असल्याचे समोर येताच पालिकेतर्फे हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. येथील नागरिकांचे अलगीकरण करण्यात आले असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

४८ वर्षीय पुरुष रुग्ण हा नेहमी प्रमाणेच डायलेसिस करायला गेला असताना संशय आल्याने त्याची तपासणी करण्यात आली होती. यात तो पॉझिटीव्ह असल्याचे समोर येताच त्याला मरोळ येथील पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाची रुग्णवाहिकेसाठी १२ तास प्रतीक्षा

कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे समोर येताच त्याला सकाळी ११ वा ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल होण्याचे सुचवत त्यासाठी रुग्णवाहिका येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र सायंकाळचे ७ वाजे‌पर्यंत त्या रुग्णाला रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत ट्रामा सेंटरच्या आवारातच रहावे लागले होते. जवळपास १२ तासानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या परिसरातील कोरोना बाधीत रुग्णाची माहिती मिळताच पालिका आरोग्य अधिकारी, स्थानिक नगरसेविका आणि पोलीस यांनी तिथे हजर होत नागरिकांना सूचना देत परिसर सील केला. दीड ते दोन हजार लोकवस्ती असणाऱ्या या परिसरात राहणाऱ्या बाधिताच्या पत्नीला आणि १५ वर्षीय मुलीला तपासणी आणि संस्थात्मक क्वारंटाईनसाठी घेवून जाण्यात आले आहे. तसेच बाधिताच्या आसपासच्या घरात राहणाऱ्या ३० रहिवाशांना गांधीनगर आणि कांजूरमार्ग येथील विलगीकरण कक्षात हलवण्यात आल्याची माहिती पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

दुसऱ्या केसमध्ये अशोकनगर जवळील एका लोकवस्तीत राहणारा ६० वर्षीय पुरुष सुद्धा कोविड – १९ पॉझीटीव्ह असल्याची माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!