मुंबईत उपचार घेत असलेल्या येमेन देशातील सहा सैनिकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पुणे येथे लपून बसलेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या आहे.
फहद रदवान अल मस्तारी (३३) आणि अली अब्दुलघानी अली अल गौझी (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
येमेनमधील सुरू असलेल्या गृहयुद्धात जखमी झालेले सैनिक उपचारासाठी मुंबईतील मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. यावेळी आरोपींनी त्यांना ते येमेनच्या दूतावासात संलग्न आहेत आणि त्यांना नवी मुंबईतील चांगल्या सुविधा असणाऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या उपचाराचा खर्च येमेन दूतावासाकडून करण्याचे आमिष दाखवले.
“त्यांनी सर्व कारवाईसाठी आमचे पासपोर्ट आणि इतर सामान आपल्या ताब्यात घेतले. तसेच पासपोर्टच्या आधारावर २ लाख ५ हजार रुपये काढले,” असे पवई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत जवान मोहम्मद गुरबान सलेह गुरबान (२६) याने म्हटले आहे.
मोहम्मद गुरबान सलेह गुरबान सह अब्दुल फताह इस्माइल ओमर, अनिस आली नाजी मोहम्मद, तौफिक मोहम्मद अब्दुल लतीफ, खालेद मोहम्मद सालेह ओबड, अब्दुल्लाह खालेद अहमद मुसेद रुग्णालयात उपचार घेत होते.
दोघांशी संपर्क होत नसल्याने त्यांनी येमेन दूतावासाशी संपर्क साधला असता असे कोणीच व्यक्ती तिथे नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पुणे येथून अटक
“तक्रारदार हे पवई पोलिसांच्या हद्दीतील परिसरात राहत होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आमचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लाड आणि पथक यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर त्या दोघांचा माग काढत पुणे येथून त्यांना अटक केली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले.
भादवि कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (विश्वासघात) नुसार गुन्हा नोंद करून येमेन नागरिकांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोघांच्या ताब्यातून आम्ही सैनिकांचे पासपोर्ट हस्तगत केले असून, अधिक तपास करत आहोत, असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी विनोद लाड यांनी सांगितले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.