रविराज शिंदे
उन्हामुळे शरिराची काहिली होत असतानाचा आयआयटी भागात बसथांब्यांवर लोकांना सावलीसाठी छत नसल्याने, प्रवाश्यांना कडक उन्हाच्या झळा सोसत उभे रहावे लागत आहे. वर्षानुवर्ष सोसत असणाऱ्या पवईकरांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी, येथील युथपॉवरच्यावतीने प्रवाश्यांना छत्री वाटून अनोखा निषेध नोंदवत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारा चिमटा काढला आहे.
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड निर्मिती दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी आकर्षक बसस्टॉप उभारण्यात आलेले आहेत. तलाव भागात बसवण्यात आलेले बसस्टॉप तर लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहेत. मात्र दुसरीकडे सामान्य पवईकर प्रवास करत असणाऱ्या आयआयटी मार्केट गेट येथे बसस्टॉप उभे करण्याचा कदाचित प्रशासनाला विसर पडला दिसत आहे.
“येथील दोन्ही बाजूच्या बसथांब्यांचा फुलेनगर, आयआयटी मार्केट, चैतन्यनगर, इंदिरानगर, माता रमाबाई आंबेडकरनगर, गरीबनगर, मोरारजीनगर व हनुमान रोड येथील रहिवाशी जवळचा बसस्टॉप म्हणून वापर करतात. आयआयटीमध्ये कामा निमित्त येणारे लोक व कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या बसस्टॉपशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. या भागातील शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी देखील याच बसस्टॉपचा वापर करतात. मात्र या सर्वांना गेली अनेक वर्षे या भागात बसस्टॉप उभे केले नसल्याने उन, पाऊसासह अनेक समस्यांचा सामना करत थांब्यावर बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. या समस्येतून नागरिकांना काहीतरी दिलासा मिळावा म्हणून आम्ही त्यांना छत्र्यांचे वाटप केले आहे. जे त्यांना ऊन, पावसा पासून वाचवेल” असे आवर्तन पवईशी बोलताना युथ पॉवर मुंबई प्रदेश अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सांगितले
स्थानिक नागरिक आणि रोजचे बसप्रवाशी रमेश कांबळे म्हणतात, “राजकीय प्रतिनिधींनी मार्गावरील बसस्टॉपच्या शेड बांधणीच्या कामांचे मोठ्या झोकात उद्घाटने केली, मात्र बसस्टॉप अजूनही बांधण्यात आलेले नाही. दोन विभागांच्या सीमेवर असल्यामुळे प्रतिनिधी याकडे कानाडोळा करत आहेत. हेच मतदार विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी असते तर याच प्रतिनिधींकडून दहा बसस्टॉप उभारण्यात आले असते.”
प्रवाश्यांना छत्र्या वाटून युथ पॉवरने प्रशासनाला चिमटा तर काढला आहे, मात्र कुंभकरणाच्या झोपेत असलेल्या प्रशासनाला यानंतर तरी जाग येते कि नाही हे पाहण्या व्यतिरिक्त प्रवाश्यांकडे दुसरा कोणताच मार्ग उरलेला नाही.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.