अवि हजारे: एस विभागात नागरिकांना कोरोना चे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी पालिकेने केलेल्या अनेक प्रयत्नानंतर सुद्धा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी साक्षात विठ्ठल- रखुमाई नागरिकांच्या दारोदारी जावून जनजागृती करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनेकमार्गे मार्गदर्शन आणि रोखून देखील लोक घराबाहेर पडत आहेत. कोरोना चा एस विभागात वाढता आकडा लक्षात घेता, लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी आषाढी एकादशीचे औचित्य साधत एस विभागातर्फे विठ्ठल – रखुमाई यांच्या वेशभूषेत रथ यात्रा काढण्यात येत आहे. हा उपक्रम विविध परिसरात २९ जून ते ३० जून पर्यंत राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मोहकर यांनी दिली.
एस विभागाअंतर्गत येणाऱ्या नाहूर, भांडुप, कंजूरमार्ग, विक्रोळी, पवई भागांत हा रथ कोरोना जनजागृतीचा संदेश देण्याकरिता फिरत आहे. ही आगळी वेगळी संकल्पना राबवणारा ‘एस विभाग’ हा मुंबईतील पहिलाच वॉर्ड आहे. ही जनजागृतीपर रथयात्रा निश्चितच परिणामकारक ठरेल असा विश्वास एस विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांनी व्यक्त केला आहे.
याचे दिग्दर्शन किरण खोत, निखिल चव्हाण, शीतल भुवड यांनी केले आहे. तर, राहुल हडकर, स्वप्नील तावडे, मिलिंद कारंजे, राजू साटम, किरण गायचोर, रोहित सुर्वे, शैलेश सुर्वे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य लाभत आहे.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.