किडनी रॅकेट: अटक केलेल्या पाचही डॉक्टरांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

आरोग्य संचालनालयाच्या अहवालाच्या आधारे व अवयव प्रत्यारोपण समन्वयकाच्या जवाबाच्या आधारावर डॉक्टरांना अटक

छायाचित्र श्रेय: बीझब्लॉग

छायाचित्र श्रेय: बीझब्लॉग

हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या पाचही डॉक्टरांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोग्य संचालनालयाच्या अहवालाच्या आधारे व अवयव प्रत्यारोपण समन्वयकाच्या जवाबाच्या आधारावर डॉक्टरांना अटक करण्यात आल्याचे समोर येत आहे. अटक केलेल्या पाच डॉक्टरांपैकी एक जण रुग्णालयाचा सीईओ आहे, तर एक जण वैद्यकीय संचालक असल्याची माहिती आहे. या गुन्ह्यात अजूनही काही डॉक्टरांचा समावेश आहे,  सबळ पुरावे आणि परवानग्या मिळताच त्यांना अटक केली जाणार आहे.

राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हिरानंदानी रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती दिली आहे.

जुलै महिन्यात हिरानंदानी रुग्णालयात एक रुग्ण भलत्याच महिलेला आपली पत्नी असल्याचे खोट्या कागदपत्रांच्या आधारे भासवून मूत्रपिंड घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, समाजसेवकांनी पवई पोलिसांच्या मदतीने छापा टाकत किडनी रॅकेटचे पितळ उघडे पाडले होते. ज्यानंतर या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या ९ लोकांना पवई पोलिसांनी अटक केली होती.

अवयव प्रत्यारोपण समन्वयकाचा जवाब व आरोग्य संचालनालयाच्या अहवालाच्या आधारावर डॉक्टरांना अटक

गुन्ह्यात अटक करण्यात आलेला रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपण समन्वयक निलेश कांबळे याने पोलिसांना दिलेल्या जवाबाच्या आधारावर व राज्य आरोग्य सेवा संचालनालयाच्या अहवालाच्या आधारावर पवई पोलिसांनी या पाचही डॉक्टरांना प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपण घडविण्याच्या कटात सहभागी असल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

“कांबळेच्या अटकेनंतर रुग्णालयाने त्याला नोकरीवरून कमी करून हात झटकल्याचे समजताच त्याने पोलिसांना यात सहभागी असणाऱ्या सर्व डॉक्टरांची नावे स्पष्ट केली होती. आरोग्य संचालनालयाच्या अहवालामुळे हे अजूनही स्पष्ट झाले. आम्ही त्यांना जवाबासाठी बोलावले असता त्यांच्या जवाबात ही विसंगती आढळून आल्यावर आम्ही सर्व सबळ पुराव्यांच्या आधारावर त्यांना अटक केली आहे,” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

रॅकेटमध्ये सहभाग असणाऱ्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांचा भांडाफोड केल्याने सुरक्षा कारणास्तव कांबळेला परिवारासह दुसरीकडे हलवले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अजून काही डॉक्टरांच्या सहभागाची शक्यता

मंगळवारी सहा डॉक्टरांचे जवाब नोंदवल्यानंतर केवळ ५ डॉक्टरांनाच अटक करण्यात आली होती. उरलेल्या एका महिला डॉक्टरला तिचा यात काहीच सहभाग नसल्याने सोडून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अजूनही काही डॉक्टरांचा यात सहभाग असल्याची माहिती समोर आली असून, सबळ पुरावे आणि परवानग्या मिळताच अजूनही काही डॉक्टरांना अटक होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!