हिरानंदानीत मोटारसायकल चालकांचा ‘वन वे’ ‘नो एन्ट्री’त धुमाकूळ; एकाला उडवले

जखमी समर चौहान

हिरानंदानी येथे सेन्ट्रल एव्हेन्यूवर पायी चालणाऱ्या मुलाला भरधाव धावणाऱ्या एका मोटारसायकल चालकाने ‘वन वे’मध्ये घुसत उडवल्याची घटना शुक्रवारी घडली. अपघातानंतर मोटारसायकल चालकाने तेथून पलायन केले असून, अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मुलाला प्रत्यक्षदर्शिने त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने मोठा धोका टळला. याबाबत पवई पोलिस “हिट अंड रन”चा गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.

हिरानंदानीच्या रस्त्यांवर तरुण मुलांकडून मोटारसायकल भरधाव पळवणे, कसरती करणे या नवीन गोष्टी नाहीत. वेळोवेळी पोलीस कारवाई होत असताना सुद्धा यात बदल घडला नसून, आता तर चक्क “नो एन्ट्री” आणि “वन वे’त धुमाकूळ घालताना मोटारसायकलवरील तरुण आढळून येत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सायप्रेस इमारतजवळ “वन वे”मध्ये “नो एन्ट्री” असणाऱ्या भागात भरधाव मोटारसायकल चालकाने पायी चालत असणाऱ्या समर चौहान नामक मुलाला उडवून तेथून पळ काढला.

‘मोटारसायकलच्या धडकेमुळे जखमी झालेला समर तिथेच जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. काही प्रत्यक्षदर्शिपैकी एक तरुण अनिल पिसे याने त्याला हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला पाच टाके पडले असून, प्रकृती स्थिर आहे,’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

‘सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवरील सायप्रेस इमारत ते ब्लू बेल इमारत या भागाला वन-वे घोषित करण्यात आले असून, एसएम शेट्टीकडून येणाऱ्या वाहनांना फक्त या भागात प्रवेश आहे. सायप्रेस कडून येणाऱ्या वाहनांना या भागात प्रवेश नाही. या दिशेने येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी येथे सुरक्षा रक्षक सुद्धा ठेवण्यात आले आहेत. तरीही अनेक मोटारसायकल चालक भरधाव गाडी चालवत सुरक्षा रक्षकांना डावलत या भागात जबरदस्ती प्रवेश करत असतात’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.

‘केवळ सुरक्षा रक्षकच नव्हे तर मोठ मोठ्या अक्षरात “प्रवेश निषिद्ध” आणि “नो एन्ट्री” लिहलेले बोर्ड आणि बॅनर या भागात लावण्यात आलेले आहेत. तरीही लोक वाचून न-वाचल्यासारखे करून जबरदस्ती या भागात घुसत असतात. स्थानिक पोलीस प्रशासनाला याबाबत आम्ही वारंवार तक्रारी सुद्धा केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून काहीच कारवाई होताना दिसत नाही,’ असेही याबाबत बोलताना स्थानिकांनी सांगितले.

या भागात घडलेली अशा प्रकारची ही पहिली घटना नसून, अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ६० वर्षीय महिला, जी स्वतः खरेदीसाठी बाहेर येत जात असे आणि कोणाच्याही आधाराशिवाय आपले सर्व काम करत असे ती अशाच प्रकारच्या अपघातामुळे सध्या अंथरुणाला खिळलेली आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी “हिट अंड रन”चा गुन्हा दाखल केला असून, स्थानिक भागात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या आधारे पळून गेलेल्या मोटारसायकलस्वाराचा शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes