बोगस कागदपत्रे बनवणाऱ्या एजंटला मिलिंदनगरमधून अटक

पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवण्यासाठी लागणारी बोगस कागदपत्रे बनवणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी मंगळवारी मिलिंदनगर, पवई येथून अटक केली आहे. फैयाज अहमद अब्दूल राशीद अन्सारी (४१) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे आणि शिक्के सुद्धा हस्तगत केली आहेत. पाठीमागील १० वर्षांपासून तो अशाप्रकारची बोगस कागदपत्रे बनवत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई मिलिंदनगर येथील फैयाज अन्सारी नामक इसम पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करत असल्याची गुप्त माहिती एका खबऱ्याने दिली होती. या खबरीच्या आधारावर साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले आणि पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून, फैयाज याच्या झुबीया इंटरप्रायजेस कार्यालयात छापा टाकला.

“तेथे झडती घेतली असता कार्यकारी दंडाधिकारी आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या सही शिक्यांची काही बोगस कागदपत्रे त्या कार्यालयात मिळून आली” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

“फैयाज याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, पॅनकार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करणे अनेक नागरिकांना त्रासदायक वाटते, अशा लोकांना हेरून त्यांना थोड्या जादा पैशाच्या बदल्यात बोगस कागदपत्रे बनवून पॅनकार्ड मिळवून दिले जाते” असे अजून एका अधिकाऱ्याने यासंदर्भात बोलताना सांगितले.

मुंबईत आलेल्या कामगारांकडे त्यांच्या मूळ गावचे आधारकार्ड असते, किंवा काही लोकांकडे आधारकार्डच नसते. मुंबईत अनेक कंपनीकडून कामगारांना मुंबईचा राहण्याचा पत्ता आणि त्या पत्त्यावरील कागदपत्रे मागितली जातात. अशा कामगारांचे त्यांच्या मुंबईच्या पत्त्यावरील आधारकार्ड दाखवण्यासाठी बनावट आधार नोंदणी रसीद बनवून देण्याचे काम फैयाज करत असल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जवाबात सांगितले आहे.

फैयाज याच्या घराची आणि दुकानाची झडती घेतली असता त्याच्याकडून पॅनकार्ड बनवण्यासाठी लागणारी ३५ ते ४० बोगस कागदपत्रे, १०० ते ११५ बनावट आधार रसिदी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांना छापेच्या ठिकाणावरून कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, विशेष कार्यकारी अधिकारी यांचे शिक्के आणि काही बोगस कागदपत्रे सुद्धा मिळून आली आहेत. इतरही काही कागदपत्रे पोलिसांना मिळून आली आहेत, मात्र ती खरी आहेत कि बनावट याची शहानिशा होणे बाकी असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

भादंवि कायदा कलम ४६५ (फसवणूक), ४६८ (फसवणूक करण्याच्या हेतूने खोटी कागदपत्रे तयार करणे), ४७१ (बोगस/बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे) अन्वये गुन्हा नोंद करून फैयाज याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फैयाज हा इतरही काही बनावट दस्तऐवज तयार करत होता का? याचा सुद्धा आम्ही शोध घेत आहोत असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश काळे यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!