जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर बर्निग कार


जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर टागोरनगर सिग्नलजवळ एका धावत्या कारला आग लागल्याची घटना मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी घडली. सुदैवाने गाडी चालक या घटनेत बचावला असून, गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. पवईकडे जाणाऱ्या मार्गावर ही गाडी जळत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने पवईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

एमएच ४६ एपी ५७०० ही कार घेवून चालक फैजल राठोड हे ऐरोलीवरून लार्सन अंड टुब्रो कंपनी पवई येथे चालले होते. पूर्व धृतगती मार्गावरून पवईकडे वळत असताना त्यांना गाडी गरम झाल्याच्या अनुभव आला. त्यांनी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला मात्र बरीच वाहतूक सुरु असल्याने त्यांना गाडी बाजूला घेणे शक्य होण्यापूर्वीच गाडीच्या इंजिनच्या भागातून धूर निघण्यास सुरुवात झाली.

“वाहनचालक गाडी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात असतानाच गाडीच्या इंजिनच्या भागाने पेट घेतला. इतर वाहनचालकांनी आरडाओरड करत वाहनचालकाला बाहेर पडण्यास सांगितले, त्यामुळे त्याचा जीव वाचला असे याबाबत बोलताना वाहतूक पोलिसांनी सांगितले.

रस्त्याच्या मधोमधच गाडी जळत असल्याने विक्रोळीकडून पवईकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, मात्र तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती.

क्रेनच्या साहय्याने गाडीला बाजूला हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!