मेडिकल सीट मिळवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टरला ५.५ लाखाला गंडवले

प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिकमध्ये खासगी रुग्णालय चालवणाऱ्या ५० वर्षीय डॉक्टरला मुलाला मेडिकल कॉलेजमध्ये सिट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन ५.५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचा तपास पवई पोलिस करत आहेत. आर के सिंग, आनंद आढाव आणि अभिषेक सिंह यांनी आयआयटी-बॉम्बे कॅम्पस जवळ ‘असोसिएट्स कन्सल्टंट’ नावाची कन्सल्टन्सी फर्म चालवत फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आले आहे. एका मराठी वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीवर फोन केल्यावर १८ लाखाच्या बदल्यात मेडिकल कॉलेजमध्ये सिट मिळवून देण्याचे आश्वासन या तिघांनी दिले होते.

तक्रारदार डॉक्टर बडगे यांचा मुलगा २०१६ साली उच्च माध्यमिक परीक्षा पास झाल्यानंतर त्याने मेडिकल क्षेत्रात जाण्याची आपली आवड वडिलांना बोलून दाखवली होती. तक्रारदार या संदर्भात तयारीत असतानाच एका वृत्तपत्रात नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागेची हमी देणारी जाहिरात त्यांच्या नजरेस पडली.

तक्रारदार यांनी जाहिरातीत दिलेल्या नंबरवर फोन करून आढाव यांच्याशी चर्चा करत एक मेडिकल सिटची मागणी केली. पवई येथील “असोसिएट्स कन्सल्टंट” या कार्यालयात आरके सिंग आणि आढाव यांना भेटून तक्रारदार यांनी सविस्तर चर्चा केली. ‘यावेळी तक्रारदार यांना १ लाख रुपये आगावू रक्कम म्हणून तर उर्वरित रक्कम छोट्या हप्त्यांमध्ये देण्यास सांगत एमबीबीएसच्या जागेची हमी दिली”, असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार यांनी बंगळुरु येथील महाविद्यालयात आपल्या मुलाला प्रवेश मिळवून देण्याची मागणी केल्यावर आरोपींनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने मागणी केल्याचा दावा करत आणखी पैसे मागितले. वारंवार होणारी पैशाची मागणी पाहता फिर्यादीला सदर प्रकार हा फसवणूकीचा असल्याचा संशय आल्याने त्यांनी आरोपींकडे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्न निष्फळ ठरला, कारण हे नंबर बंद होते.

या संदर्भात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस त्यांची ओळख पटवत शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

‘त्यांचा शोध घेण्यासोबत त्यांनी शहरात अजून काही लोकांना अशा प्रकारे फसवले आहे का याचा सुद्धा आम्ही शोध घेत आहोत,’ असे याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes