तहानलेल्या प्रवाशांना मोफत पाणी वाटप

@रविराज शिंदे

प्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच मुंबईच्या तापमानाच्या पाऱ्याने अनेकदा ४० अंशाचा आकडा ओलांडला आहे. वाढत्या पारयामुळे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना हैराण करून सोडले आहे. कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाल्यावर रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेकांना याचा खूप त्रास होत आहे. चक्कर येणे किंवा थकवा जाणवण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत. त्यातच पवईतील अनेक बस स्थानकांवर छत नसल्यामुळे लोकांना उन्हात राहूनच बसची वाट पाहत बसावे लागते. याची दाखल घेतच पवईतील ‘दुर्वा पवई वेल्फेअर फाउंडेशन’च्यावतीने पवईतील आयआयटी भागात प्रवाशांना मोफत पाणी वाटप केले जात आहे.

गेल्या महिनाभरापासून विविध वाहनातून आणि रस्त्यावरून चालत प्रवास करणाऱ्या अनेक वाटसरूंना या संस्थेच्या तरुणांकडून थंड मिनरल पाण्याचे वाटप केले जात असून, संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत त्यांच्याकडून हे कार्य केले जाणार आहे. १ एप्रिल ते १ मे कालावधीत हजारो प्रवाशी, गाडी चालकांना मोफत पिण्याचे पाणी पुरविले गेले आहे.

दुपारी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत फाऊंडेशनचे कार्यकर्ते हातात पाण्याचा ग्लास घेऊन तहानलेल्यांना पाणी देण्याचे कार्य करताना आढळून येतात. खासगी वाहन असो, रिक्षा असो किंवा बेस्ट बस यातील आवश्यकता असणाऱ्या चालक, वाहकासह प्रवाशांना पाणी देण्यात येते. सिग्नलवर गाडी थांबताच हातात पाण्याचे मग आणि ग्लास घेतेलेले तरुण या वाहनांकडे पाणी देण्यासाठी धाव घेतात, बऱ्याचवेळा बसमध्ये चढून सुद्धा यातील प्रवाशांना पाण्याचे वाटप केले जाते.

“स्वच्छ पिण्याचे पाणी मोफत मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. सर्व धर्मात पाण्याचे दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. शासन हे काम मोठ्या प्रमाणात करू शकते, मात्र ते केले जात नाही. गेल्या महिनाभर लोकांना त्यांचा हा हक्क देण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न सुरु आहे”, असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना दीप्ती अमीन यांनी सांगितले.

याकार्यात शेकडो स्वंयसेवकांनी मदत केली. फाउंडेशनचे विश्वस्त आनंदराज नाडार, विनोद अंभोरे, संजय पवार, जॉयस जोसेफ यांनी यासाठी परिश्रम घेतले.

“काही ठिकाणी पाणपोईची व्यवस्था असते मात्र तिथे असणारे पाणी हे कडक उन्हामुळे गरम झालेले असते. भर उन्हात तसे पाणी पिणे शक्य नसते, मात्र या तरुणांकडून थंड पाण्याचे वाटप केले जात असल्यामुळे लोकांना या उन्हात नक्कीच दिलासा मिळत आहे”, असे याबाबत बोलताना काही प्रवाशांनी सांगितले.

या कार्यास हातभार लावू इच्छिणाऱ्या संस्थांनी मिनरल पाण्याच्या बाटल्यांचे सहकार्य करण्याचे आवाहन दुर्वा पवई वेल्फेअर फाउंडेशन’ तर्फे करण्यात आले आहे.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes