पवईत बस स्थानकांवर मोबाईल चोरांची टोळी सक्रीय; कस्टम अधिकाऱ्याचा मोबाईल चोरला

प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत बसमध्ये चढताना असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने कस्टम अधिकार्‍याचा मोबाईल लांबवल्याची घटना शुक्रवारी पवईमध्ये घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करुन पवई पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

४२ वर्षीय तक्रारदार हे कस्टम विभागात निरीक्षक पदावर कार्यरत असून, भांडूप पूर्व परिसरात राहतात. ते मुंबई विमानतळावर कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी आपल्या वापरासाठी या महिन्याच्या सुरुवातीला नुकताच एक नवीन मोबाईल खरेदी केला होता.

“शुक्रवारी सायंकाळी पवई तलाव बस थांब्यावरुन भांडूपला जाण्यासाठी त्यांनी बस पकडली. बसमध्ये चढल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल त्यांच्या खिशामध्ये नाही,” असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

बसमध्ये सर्वत्र त्यांनी शोध घेतला मात्र मोबाईल न सापडल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने मोबाईल चोरी केल्याची त्यांची खात्री पटली.

यासंदर्भात त्यांनी पवई पोलिस ठाणे गाठून अज्ञात चोरट्या विरोधात मोबाईल चोरीची तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर पोलिस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!