पवईच्या पावसाळापूर्व कामांची आमदारांनी केली पाहणी

स्थानिक आमदार व पवईचे लाडके नेते आरिफ नसीम खान यांनी आज पवई परिसराला भेट देवून पावसाळा पूर्व कामांची पाहणी केली. यावेळी पवईतील नागरिकांना भेटून त्यांनी परिसरातील समस्यांही जाणून घेतल्या. यावेळी पालिका अधिकारी, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, वाहतूक विभाग अधिकारी, मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पवईकर उपस्थित होते.

पावसाळा आता काही दिवसांवरच येवून ठेपलेला आहे. गेल्या दहा दिवसापूर्वीच अवकाळी पावसाने मुंबईत हजेरी लावत आपल्या आगमनाची चाहूल मुंबईकरांना दिली आहे. त्यामुळे पालिकेतर्फे पावसाळ्याच्या पूर्वतयारीची चांगलीच लगबग उठली आहे. या लगबगीत काही कामे राहिली तर नाहीत ना? याची पाहणी आज आमदार आरिफ नसीम खान यांनी केली. तसेच लोकांच्या समस्या जाणून घेत त्या त्वरित सोडवण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिले.

संध्याकाळी ४ वाजता स्वामीनारायण रोड येथे भेट देवून गेल्या १५ वर्षापासून खितपत पडलेल्या रोडच्या पुनर्निर्मितीच्या कामाची पाहणी त्यांनी यावेळी केली. याबाबत लोकांच्या आवश्यकता जाणून घेत, तशा प्रकरच्या सुविधा तिथे निर्माण करण्याचे व संपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी पालिका तसेच संबंधित कंत्राटदाराला दिले. वाढत्या वाहनांच्या आवाजाविला पाहता वाहतूक विभागाला येथील वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश हि यावेळी देण्यात आले.

खाजगी विकासक, पालिका, म्हाडा अशा संपूर्ण गोतावळ्याच्या कोर्टकचेरीच्या फेऱ्यात अडकून पडलेल्या विजय विहार आणि पवई विहार रोडची पाहणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. कोर्टाकडून त्यांनी मिळवलेल्या विशेष संमतीच्या आधारावर या रोडच्या डागडूजीचे काम येत्या आठवड्याच्या आत करण्याचे सुद्धा त्यांनी यावेळी पालिका अधिकाऱ्याना दिले.

पवई विहार येथील पालिका उद्यानात जनता दरबार भरवत, येथील स्थानिकांची गाऱ्हाणी सुद्धा त्यांनी यावेळी ऐकून घेतली. आपण सर्व मिळून या परिसरातील सर्व समस्या सोडवूया असे आश्वासन देत पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुन्हा एकदा ते या परिसराला भेट देवून सर्व कामे सुरळीत झाली आहेत का नाही याची खात्री करून घेणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी लोकांना दिला.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!