ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या तरुणाची आत्महत्या

ऑनलाईन पोर्टलवर केलेल्या खरेदीमध्ये फसवणुक झाल्यामुळे सोळा वर्षीय एका तरुणाने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. ओम बली असे तरुणाचे नाव असून, कांजूरमार्ग येथे लोकलखाली उडी मारून त्याने आत्महत्या केली. दहा हजार चारशे रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीनंतर त्याने हे पाऊल उचलले. त्याच्या खिशातून सापडलेल्या चिठ्ठीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसानी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला असून, गुन्हे शाखा सुद्धा गुन्ह्याचा समांतर तपास करत आहेत.

ओम हा अकरावीमध्ये शिक्षण घेत होता त्याला मोबाईल खरेदी करायचा असल्यामुळे, तो ऑनलाईन मोबाईल विकणाऱ्या पोर्टलवर आपल्या आवडीचा मोबाईल शोधत होता. एका संकेतस्थळावर असणारा मोबाईल त्याला आवडल्यानंतर त्याने विकणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला. समोरील व्यक्तीने आपली प्रवीण अशी ओळख करून देतानाच भारतीय सैन्यात असल्याचेही ओमला सांगितले. पैशांची गरज असल्यामुळे तो हा नवीन मोबाईल स्वस्तात विकत असल्याचे सांगितले. प्रवीणने मोबाईल पॅकिंगच्या फोटोसह कुरियर पावती ओमला पाठवून पेटीएमवर पैसे पाठवण्यास सांगितले. ओमने आईच्या डेबिट कार्डचा वापर करत प्रवीणला दहा हजार चारशे रुपये ट्रान्सफर केले. मात्र दोन दिवसांनंतरही पार्सल न मिळाल्याने त्याने कुरियर बॉयला संपर्क केला, पण त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने प्रवीणशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा नंबरही बंद येत असल्याने आपण फसवलो गेले असल्याचे ओम याच्या लक्षात आले.

घटनेनंतर सतत तणावात असणारा ओम ८ डिसेंबरला बराच वेळ कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर बसून असल्याचे एका अज्ञात इसमाने फोन करून पालकांना कळवले होते. आई आणि भाऊ तिकडे पोहचले सुद्धा, मात्र त्यांच्या पोहचण्यापूर्वीच त्याने लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली होती.

मुलाच्या आत्महत्येने दुःखात असतानाच जवळपास २० दिवसांनी पालकांच्या हाती ओमने लिहलेली एक चिट्ठी सापडली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच घसरली. ऑनलाइन फसवणूक झाल्याने आई-वडिलांना काय उत्तर द्यायचे या तणावाखाली तो होता. याच तणावातून त्याने आत्महत्या केली होती. ओमच्या जुन्या मोबाईलमधील चॅट आणि चार पानांची इंग्रजी आणि मराठी भाषेत लिहलेली चिठ्ठी या सर्व पुराव्यांनिशी त्यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून पवई पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून आरोपींचा शोध सुरु केला असून, गुन्हे शाखेतर्फे सुद्धा या गुन्ह्याचा समांतर तपास केला जात असल्याचे पोलीस सूत्रांनी याबाबत बोलताना सांगितले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!