जागतिक पर्यावरण दिनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांची पवई तलाव स्वच्छता मोहीम

मुंबईतील पवई तलावाची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत प्रदूषणामुळे नष्ट होत चालली आहे. सांडपाण्या व्यतिरिक्त, घनकचरा विशेषत: प्लॅस्टिक तलावामध्ये टाकले जात असल्याने तलावाचा ऱ्हास होत चालला आहे. पवई तलाव भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या भागात टाकलेल्या कचऱ्यामुळे, तलाव पात्रात टाकलेल्या निर्माल्यामुळे या भागात कचऱ्याचे साम्राज्य वाढत जात असतानाच पवई तलावाला वाचवण्यासाठी अभ्युदय – आयआयटी पवई आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पवई तलाव भागात आज (०५ जून) जागतिक पर्यावरण दिनी क्लीनअप ड्राइव्हचे आयोजन केले होते. या उपक्रमात ३०० हून अधिक स्वयंसेवकांनी मिळून मोठ्या प्रमाणात कचरा साफ केला.

पर्यावरण जागृतीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे तरुणांच्या सहभागाने ‘पर्यावरण जनजागृती आणि स्वच्छता सप्ताहा’ची सुरुवात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे ७ जूनपासून करणार आहेत. सकाळी ८ वाजता वरळी किल्ल्यावरून ही मोहीम सुरू होईल आणि १३ जूनपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.

आयआयटी बॉम्बेने सर्वप्रथम या मोहीमेमध्ये सहभाग नोंदवला असून, रविवार, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सकाळी विद्यार्थ्यांनी पवई लेक परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. आयआयटी बॉम्बेच्या अभ्युदय टीमच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून दोन किलोमीटर लांबीचा तलाव परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेच्या माध्यमातून परिसरात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

हवामान बदल आणि स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने आपला परिसर स्वच्छ ठेवणे, पर्यावरणाची काळजी घेणे, घनकचरा व्यवस्थापन, झाडे लावणे, प्लॅस्टिकमुक्त भारत इत्यादींचे महत्त्व या मोहिमेच्या माध्यमातून पटवून देत जनजागृती करण्याचे काम अभ्युदयतर्फे करण्यात येत आहे.

एवढ्यावरच न थांबता आपले निसर्गसौंदर्य वाचवण्यासाठी आणखी काही उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी या संस्थेतर्फे करण्यात आला.

“जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अभ्युदयने पवई तलावाच्या किनाऱ्याची स्वच्छता आयोजित केली होती. यावेळी स्वच्छतेसोबतच आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत आम्ही जनजागृतीही केली आणि जवळपास ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत २ किमी लांबीच्या तलावाच्या परिघाची स्वच्छता केली,” असे याबाबत बोलताना अभ्युदयतर्फे सांगण्यात आले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!