खोट्या कागदपत्रांच्या आधारे लोन काढून मुंबईकरांना लाखोंचा चुना लावणाऱ्या चौघांना पवईत अटक

खोटी कागदपत्रे तयार करून मुंबईकरांच्या नावाने बँकेतून लोन काढून लाखोंचा गंडा घालणाऱ्या चौघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक आरोपी प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू

पवई पोलिसांनी आत्तापर्यंत त्यांच्याकडून लोनच्या पैशातून घेतेलेल्या ३ मोटारसायकली, फ्रीज, टीव्ही आणि घरगुती वापराच्या इलेक्ट्रोनिक वस्तूंसह बनावट तयार केलेली कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड येथील रहिवाशी आणि लॉजेस्टीक कंपनी चालक योगेश भाटीया यांना २८ मे रोजी त्यांच्या पवई येथील बँकेने पत्र पाठवून, त्यांनी घेलेल्या लोनचे हफ्ते भरले नसल्यामुळे तुमचे बँक खाते गोठवले असल्याची माहिती दिली होती. पत्र वाचताच भाटीया भांबावून गेले आणि त्यांनी बँकेत धाव घेतली, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचे लोन कधी घेतलेच नव्हते. यावेळी त्यांनी घेतेलेल्या मोटारसायकलीचे हफ्ते भरले नसल्यामुळे आणि ६.५ लाखाचे थकीत असल्यामुळे खाते गोठवण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

पवई पोलिसांनी हस्तगत केलेल्या घरगुती वापराच्या इलेक्ट्रिक वस्तू

कागदपत्रे तपासणीत लोन मंजूर करून घेण्यासाठी देण्यात आलेले पॅन कार्ड आणि कागदपत्रे खोटी बनवल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार नोंद केली.

पवई पोलिसांनी काढलेल्या टेक्निकल पुराव्यांच्या आधारावर बँकेत सादर करण्यात आलेली कागदपत्रे डोंबिवली येथील एका कार्यालयातून काढली गेली असल्याची बाब समोर आली. ‘तेथे छापा टाकला असता भाटीयांसह आणखी १० ते १२ लोकांची कागदपत्रे आम्हाला तेथे मिळून आली आहेत, असे याबाबत बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले. या कागदपत्रांमध्ये भाटीया यांचे पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड मिळून आले आहेत.

‘अटक आरोपींनी डोंबिवली येथे ओम साई इंटरप्रायजेस नामक कार्यालय उघडले होते. येथे कामगार निवडीच्या वेळी ते त्यांना आधी काम करत असताना मुंबईकरांकडून मिळवलेल्या कागदपत्रांची मागणी करत असत. याच कागदपत्रांचा वापर करून ते विविध बँकांमध्ये लोनसाठी अर्ज करत असे. भाटीयांची कागदपत्रे वापरून आरोपींनी मुबई, ठाणे, पालघर भागात ४ बँक आणि ११ खाजगी फायनान्स कंपनींमध्ये लोनसाठी अर्ज केले होते’ असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ नुसार गुन्हा नोंद करून अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ३ मोटारसायकली, फ्रीज, टीव्ही आणि घरगुती वापराच्या इलेक्ट्रोनिक वस्तूंसह हस्तगत केल्या असून, त्यांनी अजून किती जणांना अशा प्रकारे ठगवले आहे याचा तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , ,

One Response to खोट्या कागदपत्रांच्या आधारे लोन काढून मुंबईकरांना लाखोंचा चुना लावणाऱ्या चौघांना पवईत अटक

  1. Rkb September 1, 2018 at 11:53 am #

    Congrats to powai detection team

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes