पवईकर विवेक गोविलकर यांच्या पुस्तकाला ‘प्रभाकर पाध्ये’ स्मृती पुरस्कार’

पवईकर विवेक गोविलकर यांच्या पुस्तकाला ‘प्रभाकर पाध्ये’ स्मृती पुरस्कार’कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) साहित्यकांना देण्यात येणारे विविध विभागातील वाड्.मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यंदाचा प्रतिष्ठीत ‘प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार’ पवईकर आणि विविध भाषेतील पुस्तकांचे परीक्षण लेखक आणि कादंबरीकार विवेक गोविलकर यांच्या ‘हा ग्रंथ सागरू येव्हडा’ या पुस्तकाला देण्यात आला आहे.

यावेळी कवियत्री प्रज्ञा पवार यांना ‘कविता राजधानी’, तर कादंबरी विभागात ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार डॉ गिरीश जाखोटिया, यांच्या ‘बदल’ कादंबरीला, आणि ‘वि. वा. हडप स्मृती पुरस्कार’ डॉ दया पवार यांच्या ‘लोकशाहीतील बळीराजे’ या कादंबरीला देण्यात आला. कथासंग्रहाचा ‘वि.सी.गुर्जर स्मृती पुरस्कार’ विलास गावडे यांच्या ‘तारेवरच्या कसरती’ या कथासंग्रहाला तर ‘विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार’ विजय खाडिलकर यांच्या ‘नुक्कड’ या कथासंग्रहाला देण्यात आला. आत्मचरित्रासाठीचा ‘धनंजय कीर स्मृती पुरस्कार’ मधू पाटील यांच्या ‘खार जमिनीतील रोप’ साहित्य कृतीला तर ‘श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ यांच्या ‘स्वगत’ या पुस्तकाला देण्यात आला आहे.

आयआयटी मुंबईचे पदवीधर विवेक गोविलकर दोन दशके पवईमध्ये वास्तव्यास आहेत. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आयटी क्षेत्रात कार्य केले आहे. काही वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी पूर्णवेळ लेखन करायला सुरुवात केली. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, तरुण भारत, साधना अशा अनेक नियतकालीकांमधून त्यांनी अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत. दिपावली, अक्षर, वसा, मुक्तशब्द, अंतर्नाद, प्रतिबिंब अशा अनेक दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. याकाळात त्यांची एक इंग्रजी कादंबरी, एक मराठी कादंबरी, एक मराठी कथा संग्रह आणि एक इंग्रजी पुस्तक-परिचय संग्रह अशी चार पुस्तके सुद्धा प्रसिद्ध झाली आहेत.

दोन वर्षांपूर्वी त्यांच्या ‘युनायटेड आयर्न अँड स्टील’ या मराठी कादंबरीला कोमसापचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा २०१७-२०१८ सालच्या र.वा. दिघे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या वर्षी त्यांच्या ‘हा ग्रंथसागरू येव्हडा’ या इंग्रजी पुस्तक परिचय संग्रहाला २०१९-२०२०चा सर्वोत्कृष्ट समीक्षात्मक पुस्तकासाठी दिला जाणारा ‘प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार’ मिळाला आहे. या निमित्त नुकताच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.

आपल्या लेखणीतून जनजागृती करतानाच रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुद्धा ते करत आहेत.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!