ज्येष्ठ पत्रकार दिलीप हजारे यांचे निधन

@रविराज शिंदे

झोपडपट्टीवासियांचे ज्वलंत प्रश्न सातत्त्याने आपल्या लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ पत्रकार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी मुंबई मुख्य संघटक तसेच पवई महात्मा ज्योतिबा फुलेनगरचे संस्थापक दिलीप हजारे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने वयाच्या ५९व्या वर्षी  निधन झाले आहे. जे जे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

हजारे यांच आंबेडकरी चळवळीसाठी मोलाचं योगदान राहिलं आहे. दलित चळवळीत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कारकिर्दिला सुरूवात झाली. नंतर नव्वदच्या दशकात मुंबईतील नवाकाळ, संध्याकाळ या दैनिकातून दिलीप हजारे यांनी पञकारीतेला सुरूवात केली. पुढे ठाणे व मुंबई येथून एकाच वेळी प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक दलित-नारा तसेच पाक्षिक आम्रपाली या वृत्तपत्रांमध्ये सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. तसेच मुंबईमधून प्रकाशित होणाऱ्या दै नवाकाळ, दै नवशक्ती, दै मुंबई सकाळ या नियतकालिकेत ते विविध विषयांवर सातत्याने वैचारिक लिखाण करत होते.

नामांतराचा प्रश्न, मंडळ आयोग, मुंबईतील झोपडपट्टीवासियांचे प्रश्न, दलितांवर वाढते अन्याय-अत्याचार, स्त्रियांचे प्रश्न, असंघटीत/असुरक्षित कामगारांचे मजूरांचे प्रश्न इत्यादीं प्रश्नांसाठी लिहिण्यावर हजारे यांचा अधिक भर होता. ‘मुंबईतील झोपडपट्या- एक उपेक्षित जग’ हे त्यांच पुस्तक प्रचंड गाजलं होतं. झोपड्यातील उपेक्षित वर्गातील भयान वास्तव हजारे यांनी या पुस्तकातून मांडलं होतं.

हजारे यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी विक्रोळी टागोरनगर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंतयात्रेत विविध क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावली होती.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!