जेविएलआरवर कचऱ्याच्या ट्रकने महिलेला चिरडले; एक किरकोळ जखमी

शनिवारी एका कचऱ्याच्या ट्रकने जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला चिरडल्याची दुर्दैवी घटना पवईमध्ये घडली. महिला आपल्या मुलासोबत मोटारसायकलवरून प्रवास करत होती. या घटनेत महिलेचा मुलगा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई पोलिसांनी ट्रक चालक अलाउद्दीन सालौद्दिन शेख (२२) याला अटक केली आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडूप येथे राहणाऱ्या उन्नती उदय शिरसट (४७) या मुलगा अक्षय शिरसट (२३) याच्यासह आरे कॉलोनी येथून मोटारसायकलवरून (एमएच ०२ एफडी १३६६) जेविएलआर मार्गे घरी परतत होते. पवई येथील पवई प्लाझा सिग्नलवर हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर मुख्य मार्गाने पुढे प्रवास सुरु असतानाच सिग्नलपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर “याच मार्गावरून जात असणाऱ्या पाठीमागून आलेल्या कचऱ्याच्या ट्रकने (एमएच ०१ सिवी ०९२९) त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली.

“ही धडक एवढी गंभीर होती कि मोटारसायकल बाजूला पडली आणि पाठीमागील सीटवर बसलेल्या शिरसट या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी भरधाव वेगात जाणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली त्या आल्या.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या गंभीर रित्या जखमी झाल्या होत्या, त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषित केले,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत आणि पोलीस निरीक्षक (प्रशासन) सुप्रिया पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेत योग्य त्या कारवाईचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले.

या घटनेत मोटारसायकल चालक (अपघातात मृत पावलेल्या महिलेचा मुलगा) अक्षय हा सुद्धा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या संदर्भात पवई पोलिसांनी मुलाने दिलेल्या जवाबाच्या आधारावर भादवि कलम ३०४ (अ) (निष्काळजीपणामुळे हयगयने मृत्यूस कारण होणे) आणि ३३७ (इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोहचवणे) नुसार गुन्हा नोंद करत ट्रक चालक अलाउद्दीन सालौद्दिन शेख याला अटक केली आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: